कॅबिनेट मंत्री अटकेत- इंटरनेट सेवा बंद
वृत्तसंस्था/ खारतूम
सूडानचा हुकुमशहा उमर अल बशीरला दोन वर्षांपूर्वी सैन्याने हटविले होते. देशात आता पुन्हा एकदा सत्तापालट झाला आहे. बशीर समर्थकांनी सूडानमध्ये सत्तापालटाची घोषणा केली आहे. सैन्य दलांनी सोमवारी किमान 4 कॅबिनेट मंत्री, 5 वरिष्ठ अधिकारी आणि अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. देशात इंटरनेट अणि फोनसेवा बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान अब्दल्ला हमदोक यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
तर सूडानीज प्रोफेशनल्स असोसिएशन पार्टीने जनतेला संभाव्य सत्तापालटाच्या विरोधात रस्त्यांवर उतरण्याचे आवाहन केले आहे. सूडानमध्ये लोकशाही समर्थक मुख्य पक्ष सूडानीज प्रोफेशनल्स असोसिएशनने देशात इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क सुरू नसल्याचे म्हटले आहे. दोन आठवडय़ांपूर्वी सूडानमधील सर्वसामान्य नागरिक आणि सैन्याधिकाऱयांमधील तणाव वाढला होता, या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे.
सप्टेंबर महिन्यात सत्तापालटाचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. अत्यंत रुढिवादी धार्मिक गटांना यामुळे बळ मिळाले होते. माजी हुकुमशहा उमर अल-बशीर यांना व्यापक निदर्शनांनंतर सत्तेवरून हटविणाऱयांच्या विरोधात सैन्य राजवट इच्छिणाऱयांमध्ये रुढिवादी धार्मिक गटांचा समावेश आहे. अलिकडच्या काळात दोन्ही गट रस्त्यांवर परस्परांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमानुसार पंतप्रधान अब्दल्ला हमदोक यांना त्यांच्याच निवासस्थानात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
देशात मोबाईल नेटवर्क काम करत नसल्याने माहितीची देवाणघेवाण करणे कठिण झाले आहे. देशात नेमके काय घडतेय याची जाणीव लोकांना अद्याप पूर्णपणे झालेली नाही. देशातील स्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे. रस्ते आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सैनिकांना तैनात करण्यात आले आहे.









