दुबई / वृत्तसंस्था
कोलकातास्थित उद्योगपती संजीव गोएंका यांच्या आरपी-एसजी ग्रूपने आयपीएल स्पर्धेतील लखनौ प्रँचायझी तर आंतरराष्ट्रीय इक्विटी इन्व्हेस्टमेंट फर्म सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद प्रँचायझीवर आपली मोहोर उमटवली. संजीव गोएंका यांनी लखनौ प्रँचायझीसाठी 7090 कोटी तर सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद प्रँचायझीसाठी 5600 कोटी रुपये इतकी भरभक्कम रक्कम मोजली. सोमवारी या दोन्ही नव्या संघांची व प्रँचायझींची घोषणा केली गेली.
बीसीसीआयला या दोन्ही नव्या आयपीएल प्रँचायझीसाठी 10 हजार कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही संघांच्या माध्यमातून त्यांना 12690 कोटी रुपयांची घसघशीत रक्कम प्राप्त झाली. गोएंका हे यापूर्वी 2016 व 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजाएंट प्रँचायझीमुळे आयपीएलशी जोडले गेले होते.
गौतम अदानीच्या अदानी समुहाने 5 हजार कोटी रुपयांची बोली लावली. मात्र, त्यांना प्रँचायझी हक्क मिळवता आले नाहीत. मँचेस्टर युनायटेडच्या ग्लेझर्स व टॉरेन्ट ग्रूपची या लिलावात निराशा झाली.









