कृषी औद्योगिक सहकारी समाजाची निर्मिती ही काळाची गरज म्हणून 1950 नंतर अस्तित्वात आली. तेच सूत्र घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेची जडणघडण झाली. त्याला फलप्रामाण्यवादी तत्त्वज्ञानाची साथ मिळाली. तसे त्यागी आणि दूरदृष्टीचे नेतृत्वदेखील राज्याला लाभले. त्यामुळे सहकारी चळवळीचा योग्य पाया घातला गेला. म्हणूनच महाराष्ट्राची (मुंबई प्रांताची) सहकारी चळवळ वेगळे आदर्श निर्माण करू शकली. 1904 चा सहकारी कायदा हा प्रामुख्याने ओवेनच्या तत्त्वांच्या प्रभावाखाली तयार केलेले रायफेशियन मॉडेल होते. महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीला फलप्रामाण्यवादी तत्त्वांची आणि नेतृत्वाची चौकट मिळाली होती. धनंजयराव गाडगीळ हे शेवटचे तत्त्वज्ञानी ठरले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. गोखले अर्थशास्त्र संस्थेने चळवळीला सैद्धांतिक दृष्टी आणि दिशा दिली. त्यामुळे सहकारी चळवळ ही सर्वांगीण आणि सार्वजनिक नाविन्याची शिदोरी ठरली. त्यामुळे सहकारी चळवळीचा उर्ध्व आणि समांतर विस्तार झालेला दिसतो. हा सुवर्णकाळ 1980 पर्यंतच्या दशकापर्यंत यशस्वी झाला. त्यानंतर मात्र सहकारी चळवळीला अधोगती लागली.
1980 वे दशक हे खासगीकरणाची हवा निर्माण करणारे दशक ठरले. नव्या आर्थिक धोरणाची घोषणा 1986 साली झाली. त्याद्वारे खासगीकरणाची हवा निर्माण करण्यात आली. दरम्यानच्या काळात सहकारात स्वाहाकार बोकाळला. घराणेशाहीला लोक वैतागले. नेहमी सत्ता आपल्या हातात ठेवणारे नेते स्थानिक आव्हानाला तोंड देऊ लागले. हळूहळू खासगी साखर कारखानदारीकडे नेत्यांचा कल वळला. पण सहकाराच्या मानगुटीवर बसून खासगीकरण सुरू झाले. प्रक्रिया आणि साखर वगळता पतसंस्था, गृहनिर्माण या क्षेत्रामध्ये सहकार तग धरून आहे. दूध व्यवसायात खासगीकरण आले. पण ते अद्याप सहकाराशी स्पर्धा करू शकले नाही. पत चळवळीमध्ये सहकारी संस्था वगळता सार्वजनिक बँका आणि खासगी बँका पीक कर्ज देऊ लागले. अनेक राज्य सरकारे पत-अर्थसाहाय्य (सबसिडी) देऊ लागले. त्यामुळे सहकारातील राजकारणाला वैतागलेले लोक बँका व नागरी बँकांकडे वळले. काही विरोधी गटामध्ये काम करणारे नेते स्वतंत्र पतसंस्थांची स्थापना करू लागले. सहकारी सिंचन सुविधा वेगवेगळय़ा राजकीय गटांनी स्थापन करायला सुरुवात केली. ‘पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट’ ग्रामीण भागात सुरू झाले. पण पुढे त्या संस्थांचा वापर ‘डेव्हलपमेंट ऑफ पॉलिटिक्स’साठी होऊ लागला. सिंचन सोसायटय़ा आणि पतसंस्थांच्या भोवतीच गावचे राजकारण घुटमळत असते. अलीकडे सहकाराला अनेक पर्याय उपलब्ध झाले. त्यामध्ये कार्यक्षमता दिसू लागल्याने लोक त्या पर्यायाकडे वळू लागले.
सहकाराच्या सिद्धांतामध्ये सामूहिक कृतितत्त्वाचा गाभा असतो. गरीब व पिचलेले लोक सामूहिक कृति आराखडय़ामध्ये पुढे असतात. त्यांचा इन्किलाब (लाँग लिव्ह द रेव्होल्युशन) सामूहिक कृतिवर अवलंबून असतो. त्यामुळे सहकारी चळवळ ही गरीब व वंचित लोकांची चळवळ ठरली. दुर्दैवाने त्यामध्ये उपटसुंभ भांडवलदार व कॅपिटल पिझंटरीचा शिरकाव झाल्यामुळे त्यांचीच नेतेगिरी सुरू झाली. काही ठिकाणी घराणेशाही घुसली. अद्याप ती अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातील राजकीय व सहकारी संस्था 46 घराण्यांच्या भोवतीच फिरते. ही घराणी आता एकमेकाला जोडलेली आहेत. त्यामुळे सत्ता कुणाचीही आली तरी त्या सत्तेत ही घराणी दलबदलू वृत्तीने सहभागी होतात. काही घराण्यांना राजकीय चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून ते नेहमी सत्तेबरोबर असतात. पण स्थानिक संस्थांवरची पकड ते सोडत नाहीत. त्यामुळे सर्व आर्थिक चळवळींमध्ये अशा घराण्यांचा चंचुप्रवेश असतो. सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्टय़ा स्थानिक नाविन्य निर्माण करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. आपण बदलायचे नाही आणि दुसऱयालाही काही करू द्यायचे नाही, अशी वृत्ती बळावत आहे. काही विरोधी युवा नेतृत्वाला कशात तरी अडकवण्याचे राजकारण केले जाते. त्यातून सुटका करून त्या युवकांना आपल्या दावणीला बांधून ठेवण्याचे प्रयोग नेहमी होत असतात. अशा राजकीय डावपेचांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सहकारी चळवळीचे योगदान नष्ट होत आहे.
1950 नंतरच्या काळात संयुक्त कुटुंब व्यवस्था अस्तित्वात होती. सामूहिक कृति व्यवस्था निर्माण करणे सोपे होते. अलीकडे विभक्त कुटुंब व्यवस्था जन्माला आली. कुटुंबे सामूहिक कृतितून बाहेर पडून स्वार्थी झाली. सहकारी चळवळीत ‘फ्री रायडर्स’ची संख्या वाढली. हे फ्री रायडर्स जोपर्यंत स्वतःला फायदा होतो, तोपर्यंत ते सहकारी चळवळीच्या प्रवाहात असतात. स्थानिक राजकीय पक्षांच्या प्रभावामुळे असे नेते त्या पक्षाचे कार्यकर्ते झाले. सर्व सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये राजकीय तत्त्वज्ञानांचा चंचुप्रवेश झाला. ग्रामीण भागातील पारकट्टय़ावरच्या गप्पा केवळ राजकारणावरच असतात. हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेली पारकट्टय़ाची जागा राजकारण्यांनी व्यापली. गरीब लोक अशा प्रवृत्तीला बळी पडतात. व्होट बँक म्हणून सहकारी संस्थांचा वापर केला जातो.
सहकारी संघटन पद्धतीचा सैद्धांतिक दृष्टीकोन अभ्यासण्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ कमी पडले. सामाजिक घटक म्हणून माणसाला सार्वजनिक जीवन जगावे लागते. पण एखाद्या ठरावीक समूहामध्ये कधीपर्यंत अथवा कुठपर्यंत रहावयाचे याचे एक गणित प्रत्येक माणूस बनवित असतो. आपली जात, बिरादरी वगळूनचे ते निर्णय असतात. काहीवेळा जात, बिरादरीचाही वापर राजकारणी करून घेत असतात. प्रत्येक माणूस जगण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला असुरक्षित समजत असतो. म्हणून तो गटामध्ये अथवा समूहामध्ये राहणे पसंत करत असतो. वैयक्तिक हित आणि समूहाचे हित यामध्ये नेहमी माणूस तुलना करतो. ज्यामध्ये वैयक्तिक हिताचे अधिक्मय असते, त्यावेळी तो समूहाचे फायदे घेतो. समूहाचे हित ज्यावेळी अधिक असते त्यावेळी तो विवेकी नसतो. म्हणून सामूहिक विवेकामध्ये दूषितपणा येतो. म्हणून सहकार अथवा समूहाचे तत्त्व अयशस्वी ठरते. व्यक्तिगत निर्णयामध्ये जसा विवेक असतो, तसा सामूहिक कृतिमध्ये नसतो. पण समूहामुळे स्वतःला सुरक्षित वाटत असल्यामुळे तो समूहाचा स्वीकार करतो. ओल्सन व ओस्ट्रॉम यांच्या सिद्धांताचा अभ्यास महत्त्वाचा आहे. समूह, संस्था अथवा सामूहिक कृति ही अयशस्वी होत नसते, त्याचे नेतृत्व अपयशी होत असते. पण संस्था अथवा समूहाला दोष देऊन तो माणूस समूहातून बाहेर पडतो, हे दुर्दैव असते. ‘को-ऑपरेशन नेव्हर फेल्स बट को-ऑपरेटर्स फेल’ सहकाराला उद्ध्वस्त करणारे राजकीय नेतृत्व हेच सहकाराचे कट्टर विरोधक मानले जातात.
डॉ. वसंतराव जुगळे ः9422040684








