वार्ताहर/ देवरुख :
संगमेश्वर तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे आंबा, काजूसह अन्य पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. रविवारी सायंकाळीही पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामध्ये माखजन, आरवली भागात गारांचा पाऊस पडला. दरम्यान रत्नागिरीसह लांजा, राजापूर येथे शनिवारी रात्री पावसाच्या तुरळक सरी पडल्या.
शनिवारी 18 एप्रिल रोजी सकाळपासून प्रचंड उष्मा होत होता. या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो खरा ठरला. काही ठिकाणी वादळ झाल्यामुळे आंबा गळून पडला तर काजू पिकासह अन्य ठिकाणीही नुकसान झाले. अगोदरच कोरोनाचे संकट आणि आता अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला व दूरध्वनी नॉटरिचेबल हेते. संगमेश्वर तालुक्यातील माखजन व आरवली भागात जोरदार गारा पडत होत्या.









