संयुक्त अरब अमिरातला भारताची मदत

संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची पहिली खेप पोहोचली आहे. युएईला 55 लाख टॅबलेट्स पाठविण्यात आल्या आहेत. औषधे मिळाल्याबद्दल युएईने भारताचे आभार मानले आहेत. या औषधाचा वापर कोरोनावरील उपचारासाठी केला जात आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 37 जणांना जीव गमवावा लागला आहे.
..तर चीनला धडा शिकवू

कोरोना विषाणूसाठी चीन जबाबदार असल्याचे समजल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. अनेक प्रांतांमध्ये लोक स्टे-ऍट-होम आदेशाच्या विरोधात निदर्शने करत आहेत. मिशिगन, केंटकी, मिनिसोटा, उत्तर कॅरोलिना, ओहियोमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत.
भारत-पोलंड भाई-भाई

भारताकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषध मिळाल्यावर पोलंडचे राजदूत ऍडम बराकोवोस्की यांनी एक चित्रफित प्रसारित करत हिंदीतून आभार मानले आहेत. चित्रफितीच्या अखेरीस ते भारत-पोलंड भाई-भाई असल्याचे म्हणताना दिसून येतात. तर भारताने नेपाळ, कुवेत आणि मालदीवमध्ये सैन्याच्या डॉक्टरांचे पथक रवाना केले आहे.
संसर्गाची चौकशी व्हावी : ऑस्ट्रेलिया

कोरोना संसर्गाची स्वतंत्र चौकशी केली जावी आणि यात डब्ल्यूएचओची भूमिका असावी. विषाणूसाठी चीन जबाबदार असल्याच्या ट्रम्प यांच्या मताशी सहमत आहे. चीनने याप्रकरणी पारदर्शकता बाळगलेली नसल्याचे उद्गार ऑस्ट्रेलियाच्या विदेशमंत्री मारीज पायने यांनी काढले आहेत. या महामारीनंतर ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या संबंधांमध्ये बदल घडून येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वुहान कमी जोखिमीचे क्षेत्र

कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू राहिलेल्या वुहान शहराला कमी जोखिमीचे क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. देशातील एकूण बळींपैकी 50 टक्के मृत्यू तेथेच झाले आहेत. मागील 14 दिवसांपासून नवा रुग्ण न सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये शनिवारी 16 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे विदेशातून आलेले नागरिक आहेत.
इस्रायल : टाळेबंदी शिथिल

इस्रायल सरकारने सोशल डिस्टंन्सिंग तसेच अन्य खबरदारीचे उपाय सक्तीचे करत टाळेबंदी शिथिल करण्यास प्रारंभ केला आहे. वैयक्तिक तसेच आर्थिक क्षेत्र खुले केले जाणार आहे. घराबाहेर एकाचवेळी 10 जणांना प्रार्थना करण्याची अनुमती असेल. कंपन्या 30 टक्के कर्मचाऱयांना पाचारण करू शकतात.
बांगलादेश : अंत्यसंस्काराला मोठी गर्दी

बांगलादेशच्या बृह्मनबरिया जिल्हय़ाच्या सोरैलमध्ये शनिवारी वरिष्ठ इस्लामिक उपदेशक मौलाना जुबेर अहमद अंसारी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बांगलादेशात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा स्थितीत मोठी गर्दी होणे चिंतेची बाब ठरली आहे.








