शिक्षक संघटनेच्या निवडणुकीवेळी प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांना शिस्त लावणाऱया शिक्षकांनीच मंगळवारी बेशिस्तीचे दर्शन घडविले. प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मतदान प्रक्रियेवेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. एकाचवेळी केलेली गर्दी, विनामास्कचा वावर यामुळे येथे कोरोना नाही का, असा प्रश्न उपस्थित होत होता. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
एकीकडे कोरोनाच्या नियंत्रणासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे मात्र सरकारी कर्मचारीच त्याला खो घालत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनासाठी मागील आठ महिने शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्या केव्हा सुरू होतील, याबाबत अद्यापही शाश्वती नाही. असे असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांकडूनच कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम धुळीला मिळविल्याचे मंगळवारी दिसून आले.
प्रवेशद्वारांवर दाटीवाटीने थांबलेले शिक्षक चव्हाट गल्ली तसेच विश्वेश्वरय्यानगर या दोन्ही मतदान केंद्रांवर दिसून आले. चव्हाट गल्ली येथील मराठी शाळेत मतदानासाठी शिक्षकांची झुंबड उडाली होती. अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून आले. यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये नियोजनाचा अभाव स्पष्ट होत होता. मतदान केंद्रावर काही मोजक्मयाच शिक्षकांना सोडणे गरजेचे असताना एकाचवेळी सर्व शिक्षकांना आत का सोडले, असा प्रश्न उपस्थित होत होता. या सर्व प्रकाराचा सोशल मीडियावर नागरिक व पालकांनी चांगलाच समाचार घेतला.









