ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा कोरोना चाचणीचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, राज्यात सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 हा दर निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून, केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या. ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझमा बॅगचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले.
या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृती देखील करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.








