विश्व कसोटी चॅम्पियनशिप – बायो-बबलच्या सोयीसाठी करण्यात आला बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचे ठिकाण बदलण्यात आले असून लॉर्ड्सऐवजी साऊदम्प्टनमधील एजेस बाऊल येथे ही लढत खेळविली जाणार आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यातील ही लढत 18 ते 22 जून या कालावधीत होणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले.
आधीच्या नियोजनाप्रमाणे जेतेपदाची लढत लॉर्ड्सवर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण साऊदम्प्टनमधील पंचतारांकित सुविधा तसेच आयसीसी व इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळ या दोघांनाही तेथे दोन्ही संघांसाठी जैवसुरक्षा कवच तयार करणे सोयीचे ठरणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे. ‘विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत एजेस बाऊल येथेच होणार आहे,’ असे गांगुली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. इंग्लंडविरुद्ध नुकतीच झालेली कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकून भारताने या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले तर न्यूझीलंडने त्याआधीच अंतिम फेरी निश्चित केली होती.
बीसीसीआय अध्यक्ष गांगुली सध्या मेडिकल ब्रेकवर असून अलीकडेच्या त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते या अंतिम लढतीस उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. साऊदम्प्टनची खेळपट्टीही संथ असल्याने या लढतीत भारताची बाजू वरचढ ठरेल, असे म्हणता येईल. कारण अशा खेळपट्टीवर स्पिनर्सना वर्चस्व गाजविण्याची संधी मिळते. ‘मी या अंतिम लढतीसाठी जाणार आहे आणि या सामन्यात न्यूझीलंडवर भारतीय संघ मात करेल, अशी मी आशा करतो. न्यूझीलंड संघ या लढतीआधीच इंग्लंड दौऱयावर जाणार असून अंतिम लढतीआधी त्यांनी दोन कसोटी खेळलेल्या असतील,’ असेही गांगुली यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.
भारतीय संघाने अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱयात आणि नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शानदार प्रदर्शन केले. त्यावर गांगुली बरेच खुश झाले आहेत. ‘ज्या परिस्थितीतून खेळाडूंना जावे लागले ते पाहता या संघाने दोन्ही ठिकाणी मोठीच अचीव्हमेंट केली आहे. खरोखरच अप्रतिम कामगिरी केली आहे संघाने. आयपीएलपासून त्यांनी जी कामगिरी केलीय, ती खूपच रोमांचक ठरली आहे,’ असेही ते म्हणाले. ‘ऑस्ट्रेलियातील कामगिरीसाठी अजिंक्य रहाणे, इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीसाठी कोहली, प्रमुख प्रशिक्षक, साहायक स्टाफसह प्रत्येकाचेच आम्ही अभिनंदन करायला हवे. याशिवाय राहुल द्रविडने पडद्यामागे राहून या खेळाडूंना तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याचे योगदानही खूपच मोलाचे आहे. ब्रिस्बेनमधील कामगिरी तर विशेष लक्षणीय ठरली होती. द्रविडने खूप मोलाची कामगिरी बजावली असल्याने भक्कम राखीव फळी तयार झाली आहे. सिराज व शार्दुल ठाकुर यांनी ते ऑस्ट्रेलियात दाखवून दिले आणि शेवटची कसोटी तर बुमराह संघात नसतानाही जिंकून दाखवली,’ अशा शब्दांत त्यांनी द्रविडच्या कामगिरीचीही प्रशंसा केली.
यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा सेहवाग, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांच्या पठडीतील मॅचविनर खेळाडू असल्याचेही ते म्हणाले. सिडनी कसोटीत तो आणखी सहा षटके खेळपट्टीवर टिकला असता तर तो सामनाही भारताने जिंकला असता. सेहवाग, युवराज, धोनी यांच्याप्रमाणे एकहाती सामने जिंकून देणारा तो खेळाडू आहे. अहमदाबाद कसोटीतही त्याने दडपण असताना प्रतिहल्ला करीत इंग्लंडच्या गोलंदाजांना नामोहरम करीत शतक नोंदवले, जे शेवटी निर्णायक ठरले,’ असेही ते म्हणाले.









