जे ‘लव्ह’ ‘जिहाद’ला प्रोत्साहित करते त्याला विरोध !
भोपाळ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या धर्तीवर आता मध्यप्रदेशमध्येही धर्मांतरविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. हिंदू तरूणींना फसवून, त्यांचे धर्मांतर करून मुस्लीमांशी विवाह केला जाण्याला विरोध करण्यासाठी हा कायदा आहे. जिहादला पोसणाऱया प्रेमाला विरोध करणे हे राज्य सरकारचे कर्तव्यच आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया या राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केली.
या विधेयकाला ‘धर्म स्वातंत्र्य’ विधेयक असे नाव देण्यात आले आहे. परधर्मातील तरूण किंवा अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून धर्मांतर करून नंतर विवाह करणे, सक्तीने धर्मांतर, भीती दाखवून धर्मांतर करणे, आपण मुलीच्याच धर्माचे आहोत असा आभास निर्माण करून तिला विवाहासाठी उद्युक्त करणे तसेच विवाहाचे आमिष दाखविणे आणि नंतर तिच्यावर मानसिक दबाव आणून धर्मांतर करून विवाह करणे ही सर्व कृत्ये गुन्हा ठरविण्यात आली आहेत.
असे गुन्हे करणाऱयांना या कायद्यानुसार 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच 50 हजार रूपयांपर्यंतच्या दंडाची व्यवस्थाही करण्यात आली. या कायद्यामुळे अवैध आणि बेकायदेशीर धर्मांतराला रोखण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









