नवी दिल्ली
यंदाच्या गणतंत्रदिनी राजधानी दिल्लीच्या राजपथावर प्रथेप्रमाणे होणाऱया सेनादलांच्या संचलनासाठी कोणीही विदेशी राष्ट्रप्रमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार नाही, असे दिसत आहे. गेल्या 55 वर्षांमध्ये असे प्रथमच होत आहे. परराष्ट्र विभागाने ही माहिती गुरुवारी पत्रकारांना दिली. यंदाचा गणतंत्रदिन हा 72 वा आहे. प्रथम या दिनाच्या कार्यक्रमासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आमंत्रणाचा स्वीकारही केला होता. तथापि, ब्रिटनमधील कोरोना उदेकामुळे जॉन्सन यांनी आपला ठरविलेला भारत दौरा स्थगित केला. त्यानंतर सुरीनामचे राष्ट्रप्रमुख चंद्रिकाप्रसाद संतोखी यांना निमंत्रित करण्यात आल्याचे वृत्त होते. तथापि, आता कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 1966 नंतर ही स्थिती प्रथमच निर्माण झाली आहे. 1966 च्या गणतंत्रदिनी कोणत्याही विदेशी राष्ट्र प्रमुखाला आमंत्रित करण्यात आले नव्हते.
गणतंत्रदिनी विदेशी नेत्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्याची प्रथा 1959 पासूनची आहे. तो भारताचा प्रथमच गणतंत्रदिन होता. त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्णो यांना निमंत्रित करण्यात आले होते.









