नवी दिल्ली
आपल्याला लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करायचा असेल तर आजपासून, अर्थात 15 जानेवारीपासून मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य लावावे लागणार आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने तसा नियम केला आहे. त्याचे क्रियान्वयन आज शुक्रवारपासून होत आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी तशी सूचना आपल्या ग्राहकांना देण्यास प्रारंभ केला आहे. भविष्यकाळात मोबाईल क्रमांकामध्ये एका संख्येची वाढ झाल्यास ही सोय उपयोगी पडणार आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य लावावे लागणार याचा अर्थ मोबाईल क्रमांकामध्ये बदल झाला आहे असा नाही. तर भविष्यकाळात मोबाईल फोन्सची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठी संख्या उपलब्ध असणे आवश्यक आहे. शून्य लावल्यास 254.4 कोटी अधिक मोबाईल क्रमांक उपलब्ध होऊ शकणार आहेत, असे दूरसंचार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.









