सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्काराचाही मान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कलातीर्थ लघुपट महोत्सव या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत, सामाजिक संदेश देणाऱया ‘गोष्ट एका कावळ्याची’ या लघुपटाला ‘दादासाहेब फाळके’ सर्वोत्कृष्ट लघुपट कलातीर्थ 2021 हा किताब पटकावला. तसेच या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत हे पुरस्कार सुद्धा मिळाले.
या महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंथन खांडके, मनोज भिसे (गोष्ट एका कावळ्याची), सर्वोत्कृष्ट संगीत मिलिंद गोवेकर (गोष्ट एका कावळ्याची) यांना गौरवण्यात आले. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास डॉ. कुर्तकोटी सभागृहात भारतीय चित्र साधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कलातीर्थ महोत्सवाचे चौथे वर्ष असलेल्या लघु चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र आणि सिकंदराबाद येथून एक मिनिट गटासाठी 20 तर, एक ते दहा मिनिटे गटासाठी 53 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नामांकन मिळालेले सर्व लघुपट यावेळी दाखवण्यात आले.
यामध्ये नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, यवतमाळ, ठाणे, डोंबिवली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सिकंदराबाद येथील एकूण 73 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. महोत्सवाचे परीक्षण विलास घुले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर दादासाहेब फाळके यांची नात स्वाती फाळके-काळे, पणती गिरीजा मराठे-फाळके, नातसून वासंती फडके तसेच चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे नातू भरत दैनी आणि नात सई पेंढारकर-सपकाळे यांच्यासह विजय कदम, स्पर्धेचे परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागप्रमुख देवीदास जोशी आदी उपस्थित होते. लवकरच वाय. पी. प्रॉडक्शनच्या युटय़ुब चॅनलवर ही शॉर्टफिल्म प्रदर्शित केली जाणार आहे. वाय. पी. प्रॉडक्शनने त्यांना मदत केलेल्या सर्व आप्तजनाचे आभार मानले आहेत. रत्नागिरीतून ही घोडदौड अशीच चालू राहील, असे सांगितले. स्थानिक कलाकारांना घेऊन असे यशस्वी उपक्रम वाय. पी. प्रॉडक्शन यापुढे ही करत राहील, असेही ते म्हणाले.
लघुपटाला यशस्वीतेकडे नेणारी टीम
वाय. पी. प्रॉडक्शन आणि सिनेरिया फिल्म प्रेझेंट गोष्ट एका कावळ्याची या शॉर्टफिल्मची निर्मिती रोहित म्हात्रे, आरती पोटफोडे यांनी केली आहे. महेश कापरेकर यांची संकल्पना असलेल्या या शॉर्टफिल्मचे लेखन यतीन पवार यांनी केले. दिग्दर्शन मंथन खांडके, मनोज भिसे यांनी केले आहे. छायांकन साईप्रसाद पिलणकर, सिद्धराज सावंत, संकलन स्वामी ओमन, निखिल पाडावे यांनी तर संगीत मिलिंद गोवेकर यांचे आहे. यात कश्मिरा सावंत यांनी गायन केले. तेजश्री पिलणकर हिची रंगभूषा, यामिनी रेडीज यांची वेशभूषा आहे. साई शिरसेकर, स्वरूप शिरसेकर यांची प्रकाशयोजना तर सौरभ सावळ यांनी ध्वनिमुद्रणाची बाजू सांभाळली आहे. प्रॉडक्शन टीममध्ये स्वप्नील गावडे, सुजित मिस्त्राr, प्रथमेश भाटकर, लाईन प्रॉडक्शन म्हणून अजिंक्य कोल्हटकर, पोस्ट प्रॉडक्शन म्हणून सुबोध खामकर यांनी काम पाहिले. या शॉर्टफिल्ममध्ये बालकलाकार रुद्र बांडागळे याची प्रमुख भूमिका आहे. स्मितल चव्हाण, मनोज भिसे, संचिता जोशी, वरद चव्हाण यांच्याही यामध्ये भूमिका आहेत.









