कोलकाता
कच्च्या जूटच्या किंमतीत चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये वाढ झाल्याने यामुळे सरकारचे 2 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खाद्यान्नांच्या पॅकिंगकरता पर्यावरणमैत्रीयुक्त म्हणून कच्च्या जूटचा वापर केला जात आहे. त्याचा भार सरकारी खजिन्यावर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केंद्र अणि विविध सरकारी एजन्सीज दरवर्षी 10 ते 12 लाख टन जूटची पोती खरेदी करत असतात. ज्यांची किंमत 5 हजार 500 कोटी रुपये असते. कच्च्या जूटच्या किंमती वाढल्याने सरकारवर हा बोजा पडू शकतो. कच्च्या जूटचा दर प्रति क्विंटल 8 हजार रुपये इतका आहे, जो मार्च 2020 च्या तुलनेत 70 ते 80 टक्के अधिक आहे.









