वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्दय़ावरील तोडगा दोन्ही देश मिळून स्वतःच काढू शकतात. दोन्ही बाजूंनी थेट चर्चा करुन यावर तोडगा काढावा. या मुद्दय़ांना नुकसान पोहोचविणारी कुठलीही एकतर्फी कारवाई टाळली जावी अशी भूमिका संयुक्त राष्ट्रसंघातील भारताची उपस्थायी प्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी मांडली आहे. एक सार्वभौम आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाच्या स्थापनेसाठी भारत पाठिंबा दर्शवितो, हा देश शांतता आणि सुरक्षेसह इस्रायलसोबत रहावा असे नायडू यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना म्हटले आहे. केवळ ‘दोन देश तोडग्या’नेच शांतता प्रस्थापित होणार असून इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे लोक हेच इच्छितात आणि त्यांचा तो हक्क असल्याचे भारताचे मानणे असल्याचे नायडू म्हणाले.
या मुद्दय़ावरील प्रलंबित शांतता चर्चा पुनरुज्जीवित करण्याचे अलिकडचे कूटनीतिक प्रयत्न उत्साहनजक आहेत. ‘क्वॉर्टेट’ (पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील चार प्रमुख शक्ती) च्या विशेष राजदूतांच्या बैठका योग्य वेळेवर झाल्या आहेत. भारताने क्वॉर्टेटला इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यास सांगितले आहे, अशी माहिती नायडू यांनी दिली आहे.









