वृत्तसंस्था/ श्रीनगर
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोळी लागल्याने जखमी झालेल्या प्रसिद्ध कृष्णा ढाब्याच्या मालकाच्या मुलाचा रविवारी मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी ढाबामालकाचा पुत्र आकाश मेहता याच्यावर 17 फेब्रुवारी रोजी गोळय़ा झाडल्या होत्या. आकाशवर मागील 10 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आकाशच्या मृत्यूचे वृत्त पसरताच ट्विटरवर कृष्णा ढाबा ट्रेंड करू लागले होते.
हिंदुस्थानात हिंदू असणे गुन्हा आहे का? कुठे आहेत कथित धर्मनिरपेक्ष नेते आणि पुरस्कार वापसी गँग? असे प्रश्न वापरकर्त्याने विचारले आहेत. तर दहशतवादाने आणखी एका शूर हिंदूचा जीव घेतल्याचे अन्य व्यक्तीने म्हटले आहे. सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने आकाशच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत याला काश्मिरियतवरील कलंक ठरविले आहे.
शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध
शाकाहारी भोजनासाठी श्रीनगरमध्ये कृष्णा ढाबा अत्यंत प्रसिद्ध आहे.. भारत आणि पाकिस्तानसाठी संयुक्त राष्ट्रसंघ सैन्य पर्यवेक्षक समुहाचे कार्यालय तसेच अन्य अधिकाऱयांची निवासस्थाने या ढाब्यापासून केवळ 200 मीटर अंतरावर आहेत.
स्वीकारली जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी ‘मुस्लीम जांबाज फोर्स’ दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ही दहशतवादी संघटना 1990 च्या दशकापासूनच सक्रीय आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींचे लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या गटाशी संबंध असल्याचे सांगण्यात आले.









