हिंदू महासभेचे राहुल गांधी यांना पत्र – गोडसेभक्त नेत्याला पक्षात प्रवेश
वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांना पक्षात प्रवेश दिल्यावर काँग्रेसवर टीकेचा भडिमार होत आहे. या मुद्दय़ावरून काँग्रेसमध्येही दोन गट पटले आहेत. अशा स्थितीत हिंदू महासभेनेही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. काँग्रेसचे नाव बदलून आता ‘गोडसेवादी काँग्रेस’ करण्याची वेळ आता आली असल्याचे हिंदू महासभेने पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल यांना सांगितले आहे.
काँग्रेसने स्वतःची चूक मान्य केली असून गांधीवादी काँग्रेसमध्ये गांधींची हत्या करणाऱया गोडसेची विचारसरणी स्वीकारली असल्याचे हिंदू महासभेचे महामंत्री विनोद जोशी यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ग्वाल्हेरमध्ये नथुराम गोडसेचे मंदिर उभारणारे माजी नगरसेवक बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेसचे सदस्यत्व मिळविले आहे. यातून गांधीवादी काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य नागरिक येऊ इच्छित नसल्याचे सिद्ध होते. याचमुळे पक्षाचे नाव ‘गोडसेवादी काँग्रेस’ करण्यात यावे. यातून काँग्रेसचे राजकीय स्वरुप वाचू शकेल आणि गोडसेवादी संघटनांच्या शक्ती वाढविता येणार असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.
गोडसेभक्तावर काँग्रेसमध्ये दुफळी
हिंदू महासभेच्या नेत्याच्या प्रवेशावर काँग्रेसमध्ये दुफळी दिसून येत आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव आणि काँग्रेस नेते मानक अग्रवाल हे चौरसिया यांना पक्षात घेण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत. दिग्विजय सिंग यांचाही याला विरोध असला तरीही ते स्वतःची भूमिका उघड करणे टाळत आहेत. तर काँग्रेसचा एक गट कमलनाथ यांच्या बाजूने उभा ठाकला आहे.









