प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषेतील नियतकालिकांसमोरील विविध समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेची स्थापना करण्यात आली असून ‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून ‘सहकार सुगंध’चे संपादक भालचंद्र कुलकर्णी तर उपाध्यक्ष म्हणून ‘चपराक’ साप्ताहिकाचे संपादक घनःश्याम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
देशभरातील नियतकालिकांमध्ये 15 टक्के नियतकालिके मराठी भाषेत आहेत. 100 हून अधिक वर्षांची दिवाळी विशेष अंकांची परंपरा याच भाषेमध्ये आहे. मात्र अलीकडच्या काळात या नियतकालिकांसमोर आव्हाने उभी असून त्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठी भाषेतील नियतकालिकांतील परिस्थिती समृद्ध व्हावी यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. सागर देशपांडे हे 34 वर्षे पत्रकारितेत असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.









