तालुका कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने अंगडी यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
सज्जन राजकारणी, जननायक, शिक्षणप्रेमी आणि आपले मार्गदर्शक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने संपूर्ण राज्य दुःखात बुडाले आहे. सतत चार वेळा खासदार म्हणून निवडून येऊन त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली होती. अनेक योजना त्यांनी बेळगावसाठी आणल्या. याच बरोबर तालुका कंत्राटदार असोसिएशनलाही त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. त्यांनी मला स्वतः मुलाचा दर्जा दिला. त्यांच्या जाण्याने आपल्यावर मोठा आघात झाला असून समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे, असे मत तालुका कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत थोरवत यांनी व्यक्त केले.
बेळगाव तालुका कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. सुरेश अंगडी हे एक सच्चे राजकारणी आणि स्वच्छ चेहरा असणारे नेते होते. त्यांचे जाणे समाजावर आघात करणारे ठरले. त्यांच्या कार्यामुळेच ते लोकसभा निवडणुकीमध्ये चार वेळा खासदार झाले. त्यांच्या जाण्याने मोठे दुःख झाल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दु:ख झाले. जनसामान्यांमध्ये अत्यंत सहजपणे मिसळणारा आपला स्नेही आम्ही गमावला आहे. या भागातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत भाग घेतला होता. दृढ संकल्प, शक्ती त्यांच्याकडे होती. कोणाचेही म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. या सद्गुणांमुळेच ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले. त्यांच्या जाण्याने समाजाची हानी झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
तालुका असोसिएशन कंत्राटदारांच्यावतीने प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका कंत्राटदार असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजी चलवेटकर, विजय तिप्पाण्णाचे, तालुका पंचायत माजी सदस्य मारुती लोकूर, विनय कदम, पंकज घाडी, महेश रेडेकर, नारायण नागुर्डेकर, गंगाधर पवार, युवराज नार्वेकर, भुजंग पवार, जोतिबा थोरवत यांच्यासह इतर कंत्राटदार व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.









