काम सुरू होऊन दोन महिने पूर्ण : मध्यंतरी काम रखडल्याने वेळेत होण्याबाबत साशंकता
बेळगाव : अनगोळ चौथ्या रेल्वेगेटवर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याठिकाणी भुयारीमार्गाचे काम सुरू केले आहे. कामाला सुरुवात होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आहेत. पण अद्यापही कामाला म्हणावी तशी वेगाने सुरुवात झालेली नाही. चौथ्या रेल्वेगेटचा रस्ता 20 जूनपासून बंद झाला आहे. सदर कामाची सुऊवात केएलई इंजिनिअरिंग महाविद्यालयासमोरून करण्यात आली आहे. इथून रेल्वेगेटचे अंतर हे फक्त दोनशे मीटर आहे. पण या रस्त्यामध्ये असलेल्या भूमिगत गटार, उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी, पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन, टेलिफोन-इंटरनेट वायरिंग असल्याने हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी संबंधित विभागांच्यावतीने परवानग्या देऊन योग्य ती पावले उचलणे गरजेचे होते. अद्याप या कामासाठी योग्य ती पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.
गुरुवारपासून कामाला पुन्हा सुरुवात
चौथ्या रेल्वेगेटचे काम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. सुरुवातीला रस्ता खणण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर काही दिवसाने काम थांबविण्यात आले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. सदर भूमिगत असलेले अडथळे दूर करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला निर्माण होणाऱ्या संपर्क रस्त्याच्या बाजूने चरी मारून सिमेंट पाईप घालण्याचे काम सुरू झाले. गुरुवारपासून पुन्हा माती काढण्याचे काम सुरू झाले. पण संथगतीने सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे काम एका वर्षात पूर्ण होईल की नाही, याबद्दल नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. अनगोळ येथील अनेक नागरिक आपली वाहने रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यावर ठेवून उद्यमबागला चालत जात आहेत. सायंकाळी चालत येऊन आपली वाहने परत घेऊन जात आहेत. संत रोहिदासनगर, कलमेश्वरनगर, संतज्ञानेश्वरनगर मजगाव येथील नागरिक आपली वाहने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या शेजारी, तसेच रस्त्यालगत खुल्या जागेत लावून चालत अनगोळ येथील आपली कामे उरकून परत चालत येत आहेत. सकाळच्या सत्रात तर या भागातील लहान विद्यार्थी व पालकांची मोठीच तारांबळ होत आहे.
अनगोळ, टिळकवाडी, भाग्यनगर, तसेच आसपासच्या परिसरात असलेल्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रेल्वेफाटक चालत ओलांडून जावे लागत आहे. रस्ताच बंद असल्याने नागरिकांना आपल्या मुलांना शाळेला पाठविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही नागरिकांनी तर आपली वाहने गेटच्या आजूबाजूला असलेल्या ओळखीच्या ठिकाणी ठेवली आहेत. जेणेकरून सकाळी शाळेत सोडायला आणि आपल्या दैनंदिन छोट्यामोठ्या कामासाठी, कामावर जाण्यासाठी घरापासून गेटपर्यंत चालत येऊन आपली वाहने घेऊन जात आहेत. त्यामुळे रेल्वेगेटच्या परिसरातील नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, लवकरात लवकर वेगाने काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, कामगारवर्ग व व्यापाऱ्यांतून करण्यात येत आहे.
गणेशोत्सवकाळात मोठी गैरसोय होणार…
अनगोळ रेल्वेगेटच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. येथील नागरिक आपल्या घरातील गणेशमूर्ती अनगोळ येथील मूर्तिकारांकडून घेत असतात. आपल्या वाहनातून किंवा डोकीवरून घेऊन येतात. पण यंदा हा गेट बंद असल्याने सर्वच गणेशभक्तांना चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे.









