कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
अवघ्या 4 दिवसांनी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दिवसभर काम करून सायंकाळी नागरिक घरी येतात. त्यामुळे वर्गणी गोळा करण्यापासून ते मंडप उभारणीचे काम रात्रीच केले जात आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते रात्री जागवत मंडप उभारणीसह डेकोरेशनचे काम करू लागली आहेत.
इतरांपेक्षा आपल्या मंडळाचा देखावा कसा आकर्षक होईल याकडे गणेश मंडळांचा कल आहे. गणेशोत्सव म्हटल की आनंदाचा व उत्सवाचा सण असतो. त्यामुळे राज्यासह कोल्हापुरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. बुधवार 27 ऑगस्ट रोजी गणपती आगमन होणार असले तरी अनेक मंडळांनी बाहेरगावावरून गणपती मुर्ती आणून ठेवल्या आहेत. अनेकजण नोकरीला असल्याने दिवसभर काम करून रात्री गणपतीच्या स्वागताची तयारी करण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच रात्रीच्यावेळी वाहनांचाही त्रास होत नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी रात्रीच मंडप उभारणी व डेकोरेशन करण्यास प्राधान्य दिले आहे. सजीव देखावा करणाऱ्या गणेश मंडळांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. तर तांत्रिक देखाव्यांचे नियोजन करण्यासाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते रात्री जागवू लागले आहेत.

राजारामपुरीतील गणेश मंडळाचे देखावे उत्सुकता लावणारे असतात. त्यांनीही यंदा नवनवीन विषय निवडले आहेत. विशेषत: बुधवार पेठ परिसरात टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ डेकोरेशन करण्यावर गणेश मंडळांचा भर असतो. त्यामुळे त्यांच्याकडून जुन्या वस्तुंना रंगरंगोटी करण्यास वेग आला आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच पावसापासून संरक्षणासाठी मंडपावर पत्रा व साईटने पत्रे लावून त्यावर ताडपत्री बांधली आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने आपल्या भागातील युवा नेत्यांच्या कमानी व बोर्ड उभारण्यासाठी जागा आरक्षित केल्या आहेत.
- काही कार्यकर्त्यांनी मंडपातच तळ ठोकला
डेकोरेशनचे साहित्य, देखाव्यांसाठी साहित्य खरेदी सुरू आहे. तसेच मंडपामधील आतील पडदे आणि डेकोरेशनचे डिझाईन तयार केले जात आहे. त्यामुळे तरूण मंडळ रात्री आठपासून मध्यरात्रीपर्यंत काम करीत आहेत. ज्यांचे मंडप व स्टेज उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी मंडपातच तळ ठोकला आहे.

- सजीव व तांत्रिक देखावे उभारणीची तयारी सुरू
शहरातील बहुतांश मंडळ तांत्रिक देखावे करून गणेश भक्तांना आकर्षित करतात. त्यामुळे सध्या गाजत असलेले विषय देखाव्यात मांडण्याचे काम सुरू आहे. काही मंडळांनी तांत्रिक देखाव्यांमध्ये झाडावर नको तिथे लावलेल्या जाहिरातीमुळे झाड कसे रडू लागले, दहशतवाद, नांदणीची महादेवी हत्तीण परत आणा यासह अन्य विषय निवडले आहेत. त्यादृष्टीने तांत्रिक देखाव्याचे डिझाईन तयार करण्याचे काम सुरू आहे.
- काही मंडळांकडून पर्यावरण संरक्षणाचा संदेश
शहरातील काही मंडळ अगदी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करतात. परंतू दहा दिवस पथनाट्या, देखावा यासह अन्य माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदे देणार आहेत. त्यादृष्टीने संबंधीत गणेश मंडळांनी काम सुरू एके आहे.








