जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना : महापालिका जिल्हा दक्षता देखरेख समितीची बैठक
बेळगाव : महापालिकेच्या जिल्हा दक्षता देखरेख समितीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून यावर तोडगा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त शुभा बी., अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामण्णा बसर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत समितीकडून महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना अद्याप ओळखपत्र देण्यात आलेले नसून यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मॅन्युअल स्कॅलेंजर अंतर्गत सर्व्हे करून महापालिका कर्मचाऱ्यांची ओळख करण्यात येते.
यानंतर त्यांना ओळखपत्र देण्यात येते. मात्र अद्यापही त्यांना देण्यात आलेले नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 17 स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोड-1 व कोड-2 अंतर्गत पडताळणी करून ओळखपत्र देण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. आनंदवाडी येथे महापालिकेचे क्वॉर्टर्स आहेत. येथे अनेक वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यांना त्या क्वॉर्टर्सचे मालकी हक्कपत्र देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. 55 कर्मचाऱ्यांना हक्कपत्र देण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार 30 कर्मचाऱ्यांना हक्कपत्र देण्यात आले असून अजून 15 नावे महापालिकेला देण्यात आली आहेत. त्यांना लवकरात लवकर हक्कपत्र देण्याचीही मागणी करण्यात आली. महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही महापालिकेने कर्मचारी म्हणून नियुक्त करून घेण्याची विनंती स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आयुक्त शुभा बी. यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुलांना आयुक्तांची भेट घेण्यास सांगितले होते. यावेळी सदर मुले उच्चशिक्षित असल्याने त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम करून घेण्यास आयुक्तांनी नकार दिला. मात्र यावर तोडगा काढत त्यांची समुदाय संयोजक म्हणून नियुक्ती करून घेत कामावर रुजू करून घेतले.
याबद्दल समितीच्यावतीने आयुक्त शुभा बी. यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबद्दल आयुक्तांचे कौतुक केले. महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्येही काहीजण उच्चशिक्षित आहेत. 5 जण पीएचडी तर 3 जण डॉक्टर असून त्यांचा प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मान करण्याची मागणी विजय निर्गट्टी यांनी केली. याला प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण खात्याच्या सहसंचालकांकडे नावे देण्याची सूचना केली. तसेच लवकरच उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला दीपक वाघेला, हनुमंत कलादगी, संजीव नांद्रे आदी उपस्थित होते.









