18 महिन्यांत योजना कार्यान्वित होणार : शहरात 45 कि. मी. ची पाईपलाईन : 4500 नळजोडणी,10 लाख लिटर पाण्याची टाकी उभारणार
खानापूर : खानापूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नगरपंचायतीने नवीन पाणीपुरवठा योजनेची मागणी केली होती. शासनाने त्याची दखल घेऊन नवीन अमृत 2 ही पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी 20 कोटी ऊ. चे अनुदान मंजूर करण्यात आले असून, या योजनेचे काम हैद्राबाद येथील सीवेट या कंपनीला कंत्राट दिले आहे. या नव्या योजनेच्या कामाला सुरवात झाली असून, शहरात पाईपलाईन घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या 18 महिन्यात ही योजना कार्यान्वित होणार असून पुढील तीन वर्षे याच कंपनीकडे या योजनेच्या देखभालीचे काम राहणार आहे. त्यामुळे शहरात या पुढे रोज पाणीपुरवठा होणार आहे.
संपूर्ण पाईपलाईन बदलणार
कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाकडून ही योजना राबविली जाणार आहे. शहराच्या जुन्या पाणीपुरवठा योजना निकामी झाल्या असल्याने शहरातील संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात येणार असून तसेच सध्या असलेल्या ठिकाणी नव्याने मोठी जॅकवेल बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी 60 अश्वशक्तीच्या दोन मोटारीद्वारे पाणी खेचण्यात येणार आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आंबेडकर उद्यानात 10 लाख लिटरचा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. तसेच अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे पाणी शुद्ध करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शहरात नव्याने 4500 नळजोडणी मीटरसह देण्यात येणार आहे. त्यामुळे मीटरनुसार पाणी बिल आकारणी होणार आहे.
कूपनलिकेच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुरवठा सुरळीत
जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा योग्यपद्धतीने होत नसल्याने नव्या पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करून मंजूर करुन घेण्यात आला होता. त्यानुसार कर्नाटक सरकारने अमृत 2 या पाणीपुरवठा योजनेद्वारे नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. शहरात नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित असली तरी शहरातील सर्व नागरिक कूपनलिकेच्या पाण्याचाच उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. शहरात 120 कूपनलिका आहेत. या कूपनलिकेच्या पाण्यावर शहरात 365 पाण्याच्या टाक्या गल्लोगल्ली उभारल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक याच कूपनलिकेच्या पाण्याचा वापर करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीवर अतिरिक्त वीज बिलाचा भार पडत आहे. नगरपंचायतीने शहरातील कूपनलिकेच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. मात्र नगरपंचायतीने याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे.
पाण्याच्या स्रोताचा विचार होणे गरजेचे
शहराचा वाढलेला विस्तार आणि शासनाने मंजूर केलेली नवी पाणीपुरवठा योजना याचा विचार केला असता प्रत्येक घराला चोवीस तास मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. 10 लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात जॅकवेल उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी जुन्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या ठिकाणी नव्याने ब्रिजकम बंधारा उभाराला आहे. मात्र बंधाऱ्याची उंची फक्त 16 फूट असल्याने शहराला कायमच एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. एप्रिल ते जूनपर्यंत नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडते. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येतो. असे असताना नव्या योजनेसाठी पाण्याच्या स्त्रोत्राचा विचार न करता मोठी पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. मात्र जलस्त्राsत्रासाठी एक तर नव्याने बंधारा बांधणे गरजेचे आहे. नाही तर जुन्या बंधाऱ्याची उंची किमान 25 फुटापर्यंत वाढवणे गरजेचे आहे. या संपूर्ण पाणीपुरवठा आराखड्यात जलस्त्रोताचा विचार न करता योजना राबविण्यात येत असल्याने ही योजना यशस्वी होईल का, अशी चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे.









