जुन्या बसेस भंगारात काढण्याची गरज
बेळगाव : परिवहन खात्यातील अनेक बसेस जुन्या झाल्या असल्या तरी त्या भंगारात काढण्यात आलेल्या नाहीत. उलट त्यांची रंगरंगोटी करून त्या ग्रामीण भागात सोडण्यात आल्या आहेत. परिणामी तशा जुन्या बसेस मोठ्या प्रमाणात धूर ओकत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धूर ओकणाऱ्या एका बसेसचा व्हिडिओ गुरुवारी सांबरा गावात काहींनी घेतला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. राज्य सरकारने शक्ती योजना सुरू केल्यापासून महिला वर्गाकडून परिवहनच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. बेळगावला वारंवार ये-जा करण्यासह जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटनस्थळांना महिला भेटीगाठी देत आहेत. त्याचबरोबर सरकारने दहावी आणि बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील मोफत बससेवा सुरू केली आहे.
बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात असल्याने अनेक बसेस विविध ठिकाणी नादुरुस्त होताना दिसत आहेत. त्याचबरोबर जुन्या बसेस भंगारात काढण्याऐवजी परिवहन खात्याकडून त्यांची रंगरंगोटी केली जात आहे. तशा बसेस ग्रामीण भागातील विविध गावांना सोडण्यात आल्या असून जुन्या बसेस मोठ्या प्रमाणात धूर ओकत आहेत. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खासगी वाहनांना पीयुसी सर्टिफिकेट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्टिफिकेट नसल्यास संबंधित वाहनचालकावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पण परिवहन खात्याच्या बसेस मोठ्या प्रमाणात धूर ओकत असल्या तरी त्यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच प्रकारे धूर ओकणाऱ्या एका बसेसचा व्हिडिओ सांबरा गावात घेतला असून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने धूर ओकणाऱ्या बसेसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे परिवहन खाते लक्ष देणार का? हे मात्र पहावे लागणार आहे.









