अनियमित बसमुळे विद्यार्थी-प्रवाशांना ताटकळत थांबण्याची वेळ : परिवहन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये गावात बससेवेचा बोजवारा उडाला आहे. अपुऱ्या व अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थी व प्रवासी अक्षरश: वैतागून गेले आहेत. प्रवासी व विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. या गावाच्या बसफेऱ्यांकडे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. गावाला सुरळीत बसफेऱ्या चालू कराव्यात, अशी मागणी गावकरी करीत आहेत.गावात गेल्या तीन वर्षांपासून नियमित बसफेरी सुरू नाही, बस थांब्यावर बस येते केव्हा आणि जाते केव्हा, याची माहिती नागरिकांना बऱ्याचदा होत नाही. शिवाय बसफेऱ्या अनियमित आहेत. यामुळे प्रवासी व विद्यार्थी वर्गाना बहाद्दरवाडी क्रॉसपर्यंत चालत येऊन थांबावे लागते. तेथून कर्लेसह जानेवाडी या बसफेऱ्यांचा आधार घ्यावा लागतो.
किणये गावातील बरेचसे विद्यार्थी शाळा व कॉलेजला बेळगावला येतात. बस वेळेवर नसल्यामुळे त्यांना शाळा व कॉलेजना जाण्यासाठी उशिर होत आहे, यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती पालक वर्गाने दिली आहे. सायंकाळी बस वेळेवर येत नसल्यामुळे आपले विद्यार्थी वेळेत शाळा कॉलेजमधून घरी आले नाहीत याची चिंताही पालकांना करावी लागत आहे. सीबीटीहून किणये गावाला बस येते, मात्र गावातून सकाळी 11 वाजता बस बेळगावला गेल्यानंतर ही बस दुपारी 3 वाजता गावात येते. दुपारचे 4 तास गावात बसफेरीच नाही. गावातील नागरिक व शेतकरी बेळगावला बहुसंख्येने ये-जा करीत असतात. त्याचबरोबर कामगार वर्ग बसमधून प्रवास करतो. दुपारच्या वेळेत बसफेरी नसल्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परीक्षेच्या कालावधीत हवी बससेवा
सध्या आठवी, नववी व बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. याचबरोबर दि. 18 रोजीपासून पहिली ते सातवीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. तसेच 21 मार्चपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सध्या गावात अन्य एक नवीन बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.
…तर मोर्चा काढणार
किणये गावात गेल्या 15 वर्षापासून एकच बस धावत असते. ती सुद्धा चांगल्या स्थितीत नाही. तसेच अनियमित बसफेऱ्या असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला याचा अधिक फटका बसू लागला आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार इतकी असून गावचे मतदान 1900 इतके आहे. तसेच पश्चिम भागातील हे महत्त्वाचे गाव आहे. मात्र आमच्या गावाला सुरळीत बसफेऱ्या नाहीत. या बसफेरीसंदर्भात ग्राम पंचायतीनेही आवाज उठविणे गरजेचे आहे. गावाला दोन बसेसची आवश्यकता आहे. यामुळे आता राज्यपरिवहन मंडळाला निवेदन देऊन आम्ही मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.
– निवृत्ती डुकरे, किणये









