गडहिंग्लजमधील खुनाचा उलगडा
खुनात वापरलेली दुचाकी, व्हॅन जप्त
संशयितास तीन दिवस पोलीस कोठडी
कोल्हापूर (गडहिंग्लज)
शहरातील कचरा डेपो मार्गावर रहाणाऱ्या शोभा सदाशिव धनवडे (वय ६२) या महिलेच्या अंगावरील साडेसहा लाखाचे सोन्याचे दागिने काढून खून करून मृतदेह विहीरीत टाकल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला होता. पोलिसांनी याचा तातडीने तपास करत २४ तासात संशयिताला गजाआड केले. गुरूनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले (वय ३९, रा. हट्टीबसवाणा मंदीराजवळ, गडहिंग्लज) असे संशयीताचे नाव असून उसन्या पैशाच्या तगाद्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे दिसून आले आहे.
आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, पोलिस निरिक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार बैठक घेवून या खूनाच्या तपासाची माहिती दिली. गुरूनाथ चौगुले याचे मयत शोभा यांच्या घरासमोर भाड्याच्या जागेत किराणा मालाचे दुकान होते. जागा मालकाने बांधकाम काढल्याने त्याचे दुकान बंद झाले होते. त्यामुळे तो तेथील जवळील शोरूममध्ये वॉचमन म्हणून काम करत होता. गुरूनाथ याने घर, गाडीसाठी १२ लाखाचे कर्ज घेतले होते. तर मयत शोभा हिनेही त्याला १० हजार रूपये उसने दिले होते. उसन्या पैशाचा तगादा शोभा हिने गुरूनाथकडे लावला होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळी पैसे देण्याच्या बहाण्याने शोभा हिला मोटारसायकलवर बसवून गुरूनाथ याने आपल्या हट्टी बसवाणा परिसरातील घराकडे नेले होते. गुरूनाथची आई, आजोबा, आजी हे सर्वचजण घरात नसल्याची संधी साधत शोभा हिचा दोरीने गळा अवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील सर्व सोने काढून रात्रभर मृतदेह त्याने दारातील त्याच्याच मारूती ओम्नी गाडीत ठेवला. त्यावर बेकरीचे साहित्य रचले.
रविवारी पहाटे सोलापूरे वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळ कमी असते, याची माहिती असल्याने त्याने मृतदेह असणाऱ्या ओम्नीसह या रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या अशोक आजरी यांच्या विहीरीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी टाकून पोबारा केला. तिकडे शोभा यांची शोधाशोध करण्यात येत होती. याची फिर्याद मारूती धनवडे यांनी गडहिंग्लज पोलीसात नोंदवली होती. शोधाशोध करत असताना रविवारी सकाळी विहिरीच्या काठावर शोभा यांचा नॅपकीन आणि चप्पल सापडली. तोंडात कापडाचा बोळा आणि गळ्यावर व्रण असल्याचे शोभा यांचा खून झाल्याचा संशय होता. तो संशय आज खरा ठरला. रविवारी सकाळी महिलेच्या खुनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अजय सिंदकर यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुरूनाथ उर्फ पिंटु चौगुले याला रविवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसुन चौकशी केल्यानंतर खून केल्याचे उघडकीस आले. उसन्या पैशाची वारंवार मागणी केल्याच्या कारणावरून सौ. शोभा यांचा खून झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी २४ तासात गुन्हा उघडकीस आणून संशयित गुरूनाथ चौगुले याला गजाआड केले आहे. या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि ओम्नी कार पोलिसांनी जप्त केली आहे. संशयीत गुरूनाथ उर्फ पिंटु चौगुले याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले. अद्याप या खूनातील मयतेच्या अंगावरील सुमारे साडेसहा लाखाचे सोन्याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे करत आहेत.
Previous Articleभडगावला शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
Next Article तलवारींची विक्री करणाऱ्यास अटक








