दहा तलवारी केल्या जप्त, राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर
प्राणघातक शस्त्रांचा विक्रीसाठी साठा करणाऱ्या तरुणास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्या घरावर छापा टाकून घरातून दहा तलवारी जप्त करण्यात आल्या. राहुल संतोष घोलप (वय २३ रा. दत्त मंदिर, राजेंद्रनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्रनगर परिसरात एक तरुण विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा करणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. यानुसार राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी सकाळी राजेंद्रनगर येथील राहुल घोलप याच्या घरी छापा टाकला. यावेळी राहुल घोलप याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर लोखंडी जिन्याखाली दहा तलवारी लपवून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला अटक करुन १७ हजार रुपये किंमतीच्या तलवारी जप्त केल्या. बेळगांव येथून या तलवारी कोल्हापूरात विक्रीसाठी आणल्याची कबुली राहुल घोलप याने दिली.
Previous Articleउसने पैसे मागितल्याच्या रागातून महिलेचा खून
Next Article जीवनात नाते सर्वांत महत्त्वाचे!








