कोल्हापूरः
भडगाव (गडहिंग्लज) येथील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हिरण्यकेशीवरील भडगाव पुलाच्या खालील बाजूस करंजीच्या झाडास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गिता रामाप्पा केसरकर (वय १४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७0 वाजता उघड झाली. याची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे.
गीता हिचे वडील रामाप्पा केसरकर हे गवंडी काम करतात. रविवारी सकाळी कामासाठी ते निघून गेले होते. तर पत्नी अनिता शेताकडे गेली होती. गीता एकटीच घरी होती. दुपारी अनिता या घरी आल्यावर गीता घरी नसल्याचे दिसून आले. त्यावेळी रामाप्पा याला फोनवरून गीता घरी नसल्याचे सांगितले. गीताचा सर्वत्र शोधाशोध सुरू असता सापडत नसल्याने पोलिसांना याची माहिती दिली. सोमवारी सकाळी भडगाव पुलावर एक बॅग आणि त्याशेजारी सँडेल आढळून आले. याची माहिती मिळताच रामाप्पा याने जाऊन पाहिले असता गीताची बॅग आणि सँडेल असल्याचे ओळखले. गीताने नदीत उडी मारल्याच्या संशयाने शोधाशोध सुरू असता भडगाव पुलाच्या खालील बाजूस करंजीच्या झाडास गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. याची फिर्याद रामाप्पा केसरकर यानी गडहिंग्लज पोलिसात दिली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून तपास पोलीस करत आहेत. गीताच्या बॅगेत रोख रक्कम असल्याची चर्चा असून कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावरील एसटीची तिकीटेही तेथे सापडली आहेत. त्यामुळे नेमकी आत्महत्या का केली ? याची चर्चा घटनास्थळी होताना दिसत होती.
Previous Articleगोकाकच्या 6 भाविकांचा मध्यप्रदेशात दुर्दैवी मृत्यू
Next Article उसने पैसे मागितल्याच्या रागातून महिलेचा खून








