शेतकऱ्यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास बेकायदेशीररित्या 11 नोव्हेंबर 2021 रोजी प्रचंड पोलीस फौजफाटा घेवून रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उभ्या पिकामध्ये जेसीबी फिरविण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांनी विरोध केला. मच्छे येथील शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या मुलाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्यानंतर आता त्या मुलावर गुन्हा दाखल केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्या मुलाला नाहक न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. तेंव्हा तातडीने तो गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम मच्छे गावाकडून सुरू करण्यात आले. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. मच्छे येथील अनगोळकर या शेतकऱ्याच्या उभ्या ऊस पिकांतून जेसीबी फिरविण्यात आले. मोठे नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्याने त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे त्यांचा मुलगा आकाश अनगोळकर याने अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेतले. धक्का सहन न झाल्याने त्या मुलाने हे कृत्य केले. या घटनेनंतर उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्या तरुणावर मोफत उपचार करा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र 309 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नाहक त्या तरुणाला न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्याच्या भविष्याच्या दृष्टिने तातडीने तो गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









