युवा म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली दि. 28 रोजी धरणे आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर 4 मार्च रोजी पिरनवाडीत भव्य युवा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. युवा समितीचे शुभम शेळके यांनी खादरवाडी व बाळगमट्टी येथील बैठकीदरम्यान केले. कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी या ना त्या कारणाने बळकावण्याचे प्रयत्न होत आहेत. बेंगळूर, मणगुत्ती व पिरनवाडी येथे छ. शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मूग गिळून गप्प असणारे लोकप्रतिनिधी आता मात्र शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी मुंबईत धरणे आंदोलन होणार आहे. तसेच पिरनवाडीत होणाऱ्या युवा मेळाव्यातून भरकटलेल्या तरुणाईला समितीच्या झेंड्याखाली आणण्यासाठी प्रयत्न होणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माणिक भेकणे, कल्लाप्पा पाटील, विजय शहापूरकर, पांडुरंग हारगुडे, रोहण भेकणे, बाळाराम शहापूरकर, रमेश माळवी, भरमा पाटील उपस्थित होते.









