बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागणीसाठी मोर्चा
बेळगाव : जिह्यामध्ये दोन लाखांहून अधिक बांधकाम कामगार आहेत. त्यांना व त्यांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सध्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे महत्त्वाचे होते. मात्र अजूनही लॅपटॉप देण्यात आले नाही. याचबरोबर शिष्यवृत्ती देखील दिली गेली नाही. सध्या केवळ 800 विद्यार्थ्यांना टॅब देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तेंव्हा सर्वांनाच लॅपटॉप किंवा टॅब द्यावे यासह इतर मागण्यांसाठी बांधकाम कामगार संघटना आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. त्यांना घर बांधण्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूद आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही कामगाराला घर बांधण्यासाठी निधी देण्यात आला नाही. विद्यार्थ्यांना आहाराऐवजी थेट रक्कम द्यावी, तसेच शालेय साहित्य द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र 2021-22 आणि 2022-23 या सालातील केवळ 30 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली नाही. तेंव्हा त्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सेंट्रींग, बांधकाम कामगारांना कीट देण्यामध्येही गैरप्रकार घडला आहे. बांधकाम कामगार नसलेल्यांनाच कीट दिले गेले आहे, असा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष
अॅड. एन. आर. लातूर, शिवाजी कागणीकर, पिराजी बोम्मण्णावर, मनोहर हुंदरे, यल्लाप्पा मऱ्याप्पगोळ, श्रीदेवी बसरीमरद, प्रणाली धायगोंडे, काजल नाईक, ज्योती हुंदरे, नीता होनगेकर, माया सावंत, राणी नायक, माधुरी चलवेटकर, रामदास चौगुले यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.









