वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रंप यांना अटक होण्याची शक्यता आहे. एका पोर्नस्टारने त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत ते दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात शरण यावे लागणार आहे. मंगळवारी ते त्यांच्या वकीलांसह न्यायालयात उपस्थित झाले होते.
भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री उशीरापर्यंत त्यांच्या अटकेसंबंधातील निर्णय झालेला नव्हता. कदाचित ते न्यायालयात शरण आल्यानंतर जामीनासाठी अर्ज करण्याचीही शक्यता आहे. आपण कोणताही गुन्हा केल्याचा इन्कार त्यांनी केला होता. मात्र, त्यांना दोषी ठरविण्यात आल्याने कायद्याच्या नियमानुसार त्यांना शरण येण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक न्यायालयात उपस्थिती दर्शविली आहे. आता त्यांना कारागृहात जावे लागते की नाही, याचा निर्णय होणार असून त्यानुसार त्यांचे भवितव्य ठरेल असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे.
राजकीय परिणाम शक्य
ट्रंप यांना 2024 मध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यात स्वारस्य होते. या निवडणुकीची तयारीही त्यांनी सुरु केली होती. मात्र, त्यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जनमानसात स्थान मिळेल का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यांना सध्याच्या प्रकरणात अटक होऊन कारावास घडल्यास त्यांचा अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा मार्ग धूसर होईल, असे बोलले जात आहे.
न्यायाधीशावर टीका
न्यूयॉक येथील न्यायालयात उपस्थित राहण्यापूर्वी ट्रंप यांनी त्यांना दोषी धरणाऱया न्यायाधीशावर टीका केली. आपल्याला चुकीच्या पद्धतीने दोषी धरण्यात आले असल्याचे म्हणणे त्यांनी काही पत्रकारांसमोर व्यक्त केले आहे.









