आयर्लंड सर्व बाद 214,टेक्टरचे अर्धशतक, तैजुल इस्लामचे 5 बळी
वृत्तसंस्था/ मीरपूर
आयर्लंडचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवशी एकूण 12 गडी बाद झाले. आयर्लंडच्या टेक्टरने अर्धशतक झळकवले तर बांगलादेशच्या तैजुल इस्लामने 58 धावात 5 गडी बाद केले.

या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा पहिला डाव 77.2 षटकात 214 धावात आटोपला. हॅरी टेक्टरने 92 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 50, कॅम्फरने 73 चेंडूत 6 चौकारासह 34, टकेरने 74 चेंडूत 3 चौकारासह 37, मार्क अॅडेरने 52 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 32, मॅकब्राईनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, कर्णधार बॅलबर्नीने 16, मेकॉलमने 1 चौकारासह 15 धावा जमवल्या. आयर्लंडची एकवेळ स्थिती 3 बाद 48 अशी केविलवाणी होती. त्यानंतर टेक्टर आणि कॅम्फर यांनी चौथ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात आयर्लंडचा डाव संपुष्टात आला. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 58 धावात 5, इबादत हुसेन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 तसेच एस. इस्लामने एक गडी बाद केला.
त्यानंतर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात सुरुवात केली. पण पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर आयर्लंडच्या अॅडेरने नजमुल हुसेन शांतोचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडवला. त्यानंतर मॅकब्राईनने तमीम इक्बालला अॅडेरकरवी झेलबाद केले. त्याने 36 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 21 धावा जमवल्या. मोमिनुल हक 12 धावावर खेळत आहे. आयर्लंडतर्फे अॅडेर आणि मॅकब्राईन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड 77.2 षटकात सर्वबाद 214 (टेक्टर 50, टकेर 37, कॅम्फर 34, अॅडेर 32, मॅकब्राईन 19, बॅलबर्नी 16, मेकॉलम 15, तैजुल इस्लाम 5-85, मेहदी हसन मिराज 2-43, इबादत हुसेन 2-54, एस. इस्लाम 1-22), बांगलादेश प. डाव 10 षटकात 2 बाद 34 (तमिम इक्बाल 21, नजमुल हुसेन शांतो 0, मोमिनुल हक खेळत आहे 12, अवांतर 1, अॅडेर 1-3, मॅकब्रिने 1-13).









