प्रतिनिधी/ वाई
वाई नगरपरिषदेच्या सोनापूर कचरा डेपो येथील मैला प्रक्रिया प्रकल्पालगत वाई नगरपरिषद आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन, सेप्ट युनिव्हर्सिटी अहमदाबाद यांचे संयुक्त विद्यमाने सुमारे एक एकर जागेमध्ये वनक्षेत्र विकसित करण्यात आले आहे. सदरचे वनक्षेत्र विकसित करणे करिता वाई नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 26 दिनांक 28/01/2020 नुसार वाई नगरपरिषदेच्या सोनापूर कचरा डेपो येथील मैला प्रक्रिया प्रकल्पालगत 2 एकर जागेमध्ये वनक्षेत्र विकसित करण्यास मंजुरी मिळाली होती, परंतु त्यावेळी काही कारणास्तव है काम होऊ शकले नाही. सदरच्या ठरावाच्या आधारे वाई नगरपरिषदचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांचे प्रयत्नांतून सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन, सेप्ट युनिव्हर्सिटी यांचे मदतीने सुमारे एक एकर जागेमध्ये मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून 1400+ झाडे लावण्यात आली आहेत. सदरचे वनक्षेत्र विकसित करण्यामागे लगतच्या मैला व्यवस्थापन प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी व खताचा पुनर्वापर करणे व एक ऑक्सीजन पार्क विकसित करणे हा हेतू आहे. परिणामस्वरूप जास्त ऑक्सीजन देणाया वनस्पतींची निवड करण्यात आली यामध्ये तुळस, निंब, बकुळ, फिक्स, पेरू, जांभुळ, फणस, कोनाकार्पस आणि बांबू अशा एकूण 1400 झाडांची लागवड करण्यात आली आहे. या वनक्षेत्र निर्मितीसाठी जापानी उद्यानशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी प्रथमपणे वापरलेले मियावाकी तंत्रज्ञान वापरले गेले आहे. सदरच्या वनक्षेत्राची देखभाल करणेकरीता नगरपरिषदेच्या महिला बचत गटांना प्राधान्याने काम देण्याचे प्रस्तावित आहे, जेणेकरून सदर बचत गटांना आर्थिक पाठबळ प्राप्त होणार. वाई नगरपरिषदेच्या सोनापूर कचरा डेपो येथे उभारण्यात आलेल्या मैला प्रक्रिया प्रकल्प, 30ख्sं क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, ओल्या कच्रयापासून खत निर्मिती प्रकल्प व वनक्षेत्र यामुळे जल, मृदा व वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होण्यास चांगली मदत होणार आहे. अशा प्रकारे सदर उपक्रमामधून महिला सबलीकरण व पर्यावरण संरक्षण असा दुहेरी हेतू साध्य होणार आहे.








