इतक्यातच निवृत्त होणार नसल्याचे स्पष्टीकरण, जगभरातून मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ दोहा
विश्वचषक स्पर्धा जिंकून स्वप्न साकार केलेल्या लायोनेल मेस्सीने इतक्यातच निवृत्त होणार नसल्याचे सांगून यापुढेही काही काळ चॅम्पियन म्हणून खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
फुटबॉलमधील सर्वोच्च बक्षीस म्हणजे विश्वचषक. तो मिळविण्याचे प्रत्येक फुटबॉलपटूचे स्वप्न असते. मेस्सीची तर एक महान खेळाडूंमध्ये गणना होते, पण त्याला सर्वोच्च पुरस्कार मिळविता न आल्याने त्याच्यावर शंका घेतल्या जात होत्या. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. पण विश्वचषकाने त्याला हुलकावणीच दिली होती. 2014 मध्ये तो हा चषक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण जर्मनीने त्याचा स्वप्नभंग केला होता. यावेळची विश्वचषक स्पर्धा ही शेवटची असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे या स्पर्धेचे जेतेपद पटकावूनच निवृत्त होण्याचा त्याचा विचार होता. पण त्याने आता हा विचार बदलला असून आणखी काही काळ देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. एका रात्रीत तो स्वप्न साकारण्यात यशस्वी झाला खरा, पण ती रात्र 17 वर्षे 114 दिवसांनंतर आली होती.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने दोन गोल नोंदवत या स्पर्धेतील प्रत्येक फेरीत गोल नोंदवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे बाद फेरीतील प्रत्येक सामन्यात त्याने गोल नोंदवला. पेनल्टी शूटआऊटमध्येही त्याने एक गोल नोंदवला. ‘या सर्वोच्च पुरस्काराने कारकीर्द पूर्ण करण्याची माझी इच्छा होती, यापेक्षा मोठा दुसरा पुरस्कार असूच शकत नाही. या पुरस्काराने कारकीर्द संपवणे केव्हाही चांगलेच. पण यानंतर काय? कोपा अमेरिका आहे आणि कदाचित शेवटचा विश्वचषकही खेळेन. माझे फुटबॉलवर अतिशय प्रेम असून राष्ट्रीय संघातून खेळणे मला खूप आवडते. त्यामुळे आणखी काही काळ मी वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळण्याचा आनंद लुटणार आहे,’ असे मेस्सी म्हणाला.
विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जाणारा बॅलन डीओर पुरस्कार मेस्सीने सातवेळा पटकावला आहे. बार्सिलोना क्लबकडून खेळताना चॅम्पियन्स लीग स्पर्धा चारवेळा त्याने जिंकली आहे. पण विश्वचषक हा यात सर्वात मोठा पुरस्कार आहे. ‘त्याला आमच्यासोबत अजून खेळायची इच्छा असल्यास तो खेळू शकतो. तसा निर्णय तो घेऊ शकतो. त्याला मार्गदर्शन करणे यासारखा मोठा आनंद नाही. तो संघाला प्रेरणा देणारा स्रोत असून त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तो संघात असला की सर्व खेळाडूंवर जो सकारात्मक परिणाम होतो, तसा अनुभव मी याआधी पाहिला नाही,’ असे अर्जेन्टिना संघाचे प्रशिक्षक लायोनेल स्कॅलोनी म्हणाले.
अंतिम सामन्यात मेस्सीने दोन गोल नोंदवले तर फ्रान्सच्या एम्बापेने हॅट्ट्रिक नोंदवली. वर्ल्ड कप फायनलमध्ये (1966 नंतर) 56 वर्षानी पहिली हॅट्ट्रिक नोंदवण्याचा मान त्याने मिळविला. ‘आपले स्वप्न सत्यात उतरले, याचा आनंदच आहे. परमेश्वर हे गिफ्ट मला देणार यावर माझा विश्वास होता आणि त्याने माझा हा विश्वास यावेळी सार्थ ठरविला. यासाठी मला खूप प्रतीक्षा करावी लागली. आम्हाला खूप संघर्षही करावा लागला, पण अखेर ध्येय साध्य करण्यात यशस्वी ठरलो,’ अशा भावनाही मेस्सीने व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मेस्सी, अर्जेन्टिनाचे अभिनंदन!
नवी दिल्ली ः रविवारी अर्जेन्टिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेन्टिना संघाचे व खास करून मेस्सीचे अभिनंदन केले. अतिशय रोमांचक व संस्मरणीय ठरलेली अंतिम लढत फुटबॉल शौकिनांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशीच होती. भारतातील अर्जेन्टिना व मेस्सीच्या लाखो चाहत्यांनी या संस्मरणीय विजयानंतर देशभर जल्लोष केला, असे ते म्हणाले. ‘अतिशय थ्रिलिंग लढत म्हणून हा अंतिम सामना ओळखला जाईल. फिफाचे वर्ल्ड चॅम्पियन झाल्याबद्दल अर्जेन्टिनाचे अभिनंदन!’ असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.
अर्जेन्टिनाच्या विजयानंतर भारतातही मेस्सीच्या चाहत्यांनी फटाके वाजवून व आतषबाजी करून आनंद साजरा केला. फुटबॉल लोकप्रिय असलेल्या गोवा, केरळ, कोलकाता, मुंबई, दिल्ली, कोल्हापूर या मोठय़ा शहरांसह सर्वत्र जल्लोष करताना चाहते दिसून आले.
कतार विश्वचषक स्पर्धेत विक्रमी गोलांची नोंद
लुसैल ः अर्जेन्टिना व फ्रान्स यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत सहा गोलांची नोंद झाल्यानंतर या स्पर्धेतील विक्रमी 172 गोलांची नोंद झाली. यापूर्वी 1998 व 2014 मधील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 171 गोल झाले होते. फ्रान्समध्ये झालेल्या 1998 मधील स्पर्धेपासून 32 संघांच्या सहभागाचा व 64 सामन्यांचा फॉरमॅट सुरू झाला. 2026 मध्ये अमेरिका-कॅनडा-मेक्सिकोमध्ये होणाऱया स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता आहे. कारण या स्पर्धेपासून 48 संघ सहभागी होणार असून 80 किंवा 104 सामने होण्याची शक्यता आहे.
रविवारच्या अंतिम सामन्यात एकूण 6 गोल नोंदवले गेले. सलग दुसऱया अंतिम सामन्यात सहा गोलांची नोंद झाली. 2018 रशियामधील स्पर्धेत फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 याच गोलफरकाने पराभव केला होता. कतारमध्ये सर्वाधिक गोलांचा विक्रम झाला असला तरी सरासरी मात्र बरीच कमी झाल्याचे दिसून आले. येथील गोलांची सरासरी 2.63 अशी झाली, जी 5.38 या विक्रमापेक्षा खूपच कमी आहे. 1954 मध्ये स्वित्झर्लंडमधील स्पर्धेत हा सरासरीचा विक्रम नोंदवला गेला होता.
विविध वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी
गोल्डन बॉल (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू) ः मेस्सी, अर्जेन्टिनाö7 गोल, 3 असिस्ट
सिल्व्हर बॉल (दुसरा क्रमांक) ः किलियन एम्बापे, फ्रान्स-8 गोल, 2 असिस्ट
ब्राँझ बॉल (तिसरा क्रमांक) ः लुका मॉड्रिच, क्रोएशिया.
गोल्डन बूट (सर्वाधिक गोल) ः किलियन एम्बापे, 8 गोल
सिल्व्हर बूट (दुसरा क्रमांक) ः मेस्सी, 7 गोल
ब्राँझ बूट (तिसरा क्रमांक) ः ऑलिव्हिएर गिरोड व ज्युलियन अल्वारेझ, प्रत्येकी 4 गोल
गोल्डन ग्लोव्ह (सर्वोत्तम गोलरक्षक) ः एमिलियानो मार्टिनेझ (3 क्लीन शीट्स)
सर्वोत्तम युवा खेळाडू ः एन्झो फर्नांडेझ, अर्जेन्टिना.









