गुगलचे सीईओ भारताच्या दौऱयावर
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पिचाई यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीची माहिती ट्विट करत दिली आहे. गुगलचे सीईओ पिचाई हे भारतातील गुगलचा सर्वात मोठा कार्यक्रम गुगल फॉर इंडियाच्या 8 व्या आवृत्तीत सामील होण्यासाठी दौऱयावर आले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तांत्रिक परिवर्तनाचा मोठा वेग पाहून प्रेरणा मिळते. आमची मजबूत भागीदारी जारी ठेवणे आणि सर्वांसाठी काम करणाऱया एका खुल्या, कनेक्टेड इंटरनेलट पुढे नेण्यासाठी भारताच्या जी20 अध्यक्षत्वाचे समर्थन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे पिचाई यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर ट्विट करत म्हटले आहे.
गूगल फॉर इंडियाच्या 8 व्या आवृत्तीत सामील होण्यासाठी भारतात पोहाचलेलेले सुंदर पिचाई यांनी माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली आहे. यादरम्यान दोन्ही दिग्गजांमध्ये भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासंबंधी चर्चा झाली आहे. स्टार्टअपसाठी प्रत्येक क्षण उत्तम आहे, आम्ही सध्या मॅक्रो-इकॉनॉमिक स्थितीच्या माध्यमातून काम करत असलो तरीही स्टार्टअप विकसित करण्याची नामी संधी असल्याचे पिचाई यांनी वैष्णव यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान म्हटले आहे.
भारतातून व्यवसाय करत असलेल्या स्टार्टअपवर गुगल लक्ष केंद्रीत करत आहे. या नव्या कंपन्यांसाठी 30 कोटी डॉलर्सच्या निधीपैकी एक चतुर्थांश रक्कम महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये गुंतविण्यात येणार आहे. तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणावर वापरण्यात येत असून जगभरातील लोकांच्या जीवनाला प्रभावित करत आहे. अशा स्थितीत जबाबदार आणि संतुलित नियम तयार करण्याची मागणी उपस्थित होत आहे. याकरता भारताचे असलेले निकष अन् तंत्रज्ञान पाहता लोकांसाठी सुरक्षा उपाययोजना करत संतुलन साधणे महत्त्वपूर्ण असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे.









