वृत्तसंस्था/ रोम
एटीपी व डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या 1000 दर्जाच्या मास्टर्स पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह तसेच निकोलास जेरी यांनी पुरूष एकेरीची अंतिमफेरी गाठली आहे. महिलांच्या विभागात साबालेंकाने ओस्टापेंकोला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुरूष एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने चिलीच्या तेबिलोचा 1-6, 7-6 (7-4), 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात निकोलास जेरीने अमेरिकेच्या टॉमी पॉलचे आव्हान 6-3, 6-7 (3-7), 6-3 असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. आता व्हेरेव्ह आणि जेरी यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. एटीपी टूरवरील मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत यापूर्वी जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरीस बेकरने 11 वेळेला अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला होता. बेकरच्या विक्रमाशी आता जर्मनीच्या व्हेरेव्हने बरोबरी साधली आहे. एटीपी टूरवरील मास्टर्स टेनिस स्पर्धांना 1990 पासून प्रारंभ झाला होता. 2007 नंतर रोममधील या स्पर्धेत चिलीच्या फर्नांडो गोंझालेझने अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर असा पराक्रम करणारा निकोलास जेरी हा चिलीचा पहिला टेनिसपटू आहे.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात आर्यना साबालेंकाने लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेंकोचा 6-2, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. साबालेंकाने हा उपांत्य सामना 80 मिनिटात जिंकला असून तिने आतापर्यंतच्या झालेल्या ओस्टापेंको बरोबरच्या सर्व सामन्यात विजय मिळविला आहे. महिला दुहेरीमध्ये इटलीच्या सारा इराणी व जस्मिन या जोडीची अंतिम लढत अमेरिकेची कोको गॉफ व इरीन रूटलिफ यांच्याबरोबर होणार आहे. इटलीच्या जेनिक सिनेर आणि मॅटो बेरेटिनी यांनी या स्पर्धेतून सुरूवातीलाच माघार घेतली होती.









