दोन मित्रांसमवेत जर्मनीतून रेल्वेने पलायन
प्रतिनिधी/ बेंगळूर
लैंगिक शोषण प्रकरणातील प्रमुख आरोपी असणारे हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी जर्मनीतून काढता पाय घेत लंडनमध्ये आसरा घेतला आहे. प्रज्ज्वल यांच्या अटकेसाठी एसआयटीने हालचाली गतिमान केल्या आहेत. दरम्यान, त्यांनी इंग्लंडमधील भारतीय उद्योजकाच्या साहाय्याने दोन मित्रांसोबत रेल्वेने जर्मनीच्या म्युनिचहून लंडनला पोबारा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दुबई येथील एक आणि मूळचा बेंगळूरमधील एक मित्र प्रज्ज्वलसोबत आहेत. ते तिघे एकत्र लंडनला गेल्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रज्ज्वल मागील 15 दिवसांपासून कुटुंबीयांच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे त्यांचा माग काढण्यात एसआयटीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता एसआयटीचे अधिकारी कोणते पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
प्रज्ज्वल यांच्याविरोधात महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी 27 एप्रिल रोजी जर्मनीला प्रयाण केले. त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी एसआयटीने नोटीस बजावल्यानंतरही ते भारतात परतले नाहीत. त्यांनी सहा दिवसांची मुदत एसआयटीकडे मागितली. ही मुदत संपल्यानंतरही ते संपर्कात नसल्याने एसआयटीने इंटरपोलच्या मदतीने प्रज्ज्वल यांच्याविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती.
दोनवेळा प्ररतीच्या प्रवासाचे विमान तिकीट रद्द
प्रज्ज्वल यांनी मायदेशी परतण्यासाठी बुकींग केलेली विमानतिकिटे दोनवेळा रद्द केली आहेत. 3 मे आणि 15 मे रोजी बेंगळूरला येण्यासाठी बुकींग केलेली विमानाची तिकीटे त्यांनी रद्द केली. त्यामुळे त्यांच्या पुढील विमानप्रवासावर एसआयटीने लक्ष ठेवले आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर म्हणजेच 4 जूननंतर प्रज्ज्वल भारतात परततील, अशी चर्चा होती, तर दुसरीकडे परत येण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रज्ज्वल यांच्यावर दबाव येत असल्याची चर्चा आहे.
व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचे कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या कुद्रेमुख पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रज्ज्वल असे आरोपीचे नाव असून तो मुडिगेरे तालुक्यातील संसे या गावचा रहिवासी आहे. आरोपीने खासदार प्रज्ज्वल यांचे व्हिडिओ फेसबूक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. त्याच्याविरुद्ध कुद्रेमुख पोलीस स्थानकात आयपीसी सेक्शन 67, 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
बँक खाते गोठवले?
लैंगिक शोषण प्रकरणातील आरोप प्रज्ज्वल रेवण्णा यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी एसआयटीच्या पथकाने आता कठोर पाऊल उचलले आहे. प्रज्ज्वल यांच्याशी संबंधित सर्व बँक खात्यांची माहिती एसआयटीने मिळविली असून ती गोठविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मागील दोन आठवड्यात प्रज्ज्वल यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करणाऱ्यांची माहिती मिळविण्यात आली आहे. एसआयटीला मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या नावे 7 बँक खाती आहेत.
प्रज्ज्वलविरुद्ध वॉरंट
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अटकेसाठी वॉरंट काढण्यात आले आहे, शिवाय त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यास न्यायालयाने अनुमती दिली आहे. बेंगळूरच्या 42 व्या एसीएमएम न्यायालयाने प्रज्ज्वलविरुद्ध जारी केलेल्या नोटिसींची माहिती मागविली होती. एसआयटीने नोटीस, लुकआऊट नोटीस, ब्ल्यू कॉर्नर नोटीस याविषयी माहिती दिली. तसेच प्रज्ज्वल यांच्या अटकेसाठी चार्जशिटची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एसआयटीने आता प्रज्ज्वल यांच्याविरुद्ध सीबीआयच्या मदतीने रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. रेडकॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर प्रज्ज्वल यांचा पासपोर्ट रद्द होणार असून त्यामुळे त्यांना अटक करणे सोपे होईल.









