कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत काही भागात मुसळधार पाऊस : मध्यप्रदेशसह नऊ राज्यांत तापमानात प्रचंड वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या उत्तर भागात उष्णतेचा प्रभाव तीव्र झाला असला तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून पाच दिवस तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम आणि त्रिपुरामध्ये उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कर्नाटकात दोन दिवसांनी म्हणजे 20 मे पासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे.
कर्नाटकातील शिमोगा, चिक्कमंगळूर, कोडगू, हासन, म्हैसूर, मंड्या, चामराजनगर, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये 18 ते 21 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच कोडगू, हासन, म्हैसूर, मंड्या आणि तुमकूर या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अलर्टही जारी करण्यात आला.
केरळमधील मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच इतर आठ जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 मे दरम्यान पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. लोकांना 21 मे पर्यंत समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जोरदार वादळ आणि वादळाची शक्मयताही व्यक्त करण्यात आली आहे.
तामिळनाडूत शुक्रवारीही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तामिळनाडूच्या एसडीआरएफच्या पथकाने पूरस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमधील सखल भागात मुसळधार पावसाचा सामना करण्याची तयारी सुरू आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे तिऊपूर जिह्यातील तिऊमूर्ती डोंगरावर असलेल्या अमनलिंगेश्वर मंदिरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली.
हवामान खात्याने दिल्लीसह 9 राज्यांमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या राज्यांमध्येही तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी या राज्यांतील अनेक शहरांतील तापमान 43 ते 46 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कमाल तापमान 46.9 अंशांवर पोहोचल्याची नोंदही शनिवारी झाली.









