कुंभमेळ्यातील पुण्यस्नान आटोपून परतताना काळाचा घाला : दोघे जखमी, क्रूझर दुभाजकाला धडकल्याने वाहनाचा चेंदामेंदा
बेळगाव : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील संगमावर पुण्यस्नान करून घरी परतणाऱ्या गोकाक येथील भाविकांच्या वाहनाला मध्यप्रदेशमध्ये सोमवारी पहाटे अपघात झाला आहे. या अपघातात सहा भाविक जागीच ठार झाले असून क्रूझर चालकासह दोघे जण जखमी झाले आहेत. जबलपूर जिल्ह्यातील सिव्होराजवळ ही घटना घडली आहे.केए 49 एम 5054 क्रमांकाच्या क्रूझरमधून गोकाक येथील आठ भाविक प्रयागराजला गेले होते. पुण्यस्नान आटोपून व इतर धार्मिकस्थळांचे दर्शन घेऊन गावी परतताना सोमवारी पहाटे मध्यप्रदेशमधील सिव्होराजवळ दुभाजकाला आदळून क्रूझर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. भालचंद्र नारायण गौडर (वय 50), सुनील बालकृष्ण शेडशाळे (वय 45), बसवराज निरपादप्पा कुरट्टी (वय 63), बसवराज शिवाप्पा दोडमनी (वय 49), इराण्णा शंकऱ्याप्पा सेबिनकट्टी (वय 27), विरुपाक्ष चन्नाप्पा गुमती (वय 61) अशी दुर्दैवी भाविकांची नावे आहेत. हे सर्वजण गोकाक परिसरातील राहणारे होते.
क्रूझर चालक मुश्ताक शिंदीकुरबेट व सदाशिव केदारी उपलानी हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यप्रदेशमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अपघातातील मृतांच्या नावांची खातरजमा केली आहे. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनीही मध्यप्रदेश प्रशासनाशी चर्चा केली असून सर्व सहा मृतदेह गोकाकला पाठवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांबद्दल दु:ख व्यक्त केले. गोकाक परिसरातील आठ जण क्रूझरमधून प्रयागराजला गेले होते. पुण्यस्नानानंतर गावी परतताना ही घटना घडली आहे. अपघातात वाहनाचाही चेंदामेंदा झाला आहे. सोमवारी सकाळी स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवले. जखमींना जबलपूर येथील जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले आहे, अशी माहिती जबलपूरचे जिल्हाधिकारी दीपककुमार सक्सेना यांनी दिली आहे.
महिनाभरात बेळगाव येथील 14 भाविकांचा मृत्यू
प्रयागराज येथे मकर संक्रांतीपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली. महिनाभरात बेळगाव येथील 14 भाविकांचा चेंगराचेंगरी व वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. 29 जानेवारी 2025 रोजी पुण्यस्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगाव येथील अरुण कोपर्डे (वय 61) रा. शेट्टी गल्ली, महादेव बावनूर (वय 48) रा. शिवाजीनगर, मेघा हत्तरवाट (वय 24), तिची आई ज्योती हत्तरवाट (वय 44) दोघीही रा. वडगाव या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशमधील मानपूरनजीक झालेल्या तिहेरी अपघातात देवदर्शनाला गेलेल्या ज्योती खेडेकर (वय 64) रा. आनंदनगर-वडगाव, सागर शहापूरकर (वय 40) रा. होसूर बसवाण गल्ली, नीता बडमंजी (वय 43) रा. क्रांतीनगर-गणेशपूर, संगीता तेली (वय 48) रा. शिवाजीनगर या चार भाविकांचा मृत्यू झाला होता. तर टेम्पोमधील 17 जण जखमी झाले होते. या दोन घटनांच्या आठवणी ताज्या असतानाच सोमवारी सकाळी मध्यप्रदेशमध्ये झालेल्या वाहन अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









