फेसबुक व्हिडिओवरून माळमारुती पोलिसांकडून एफआयआर नोंद
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते शुभम शेळके यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील घटनेनंतर मराठी नेते, कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविण्यात येत असून कन्नड संघटनांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा माळमारुती पोलिसांनी स्वत:हून एफआयआर दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 192, 352, 353 अन्वये एफआयआर दाखल झाला आहे. हवालदार केंपण्णा दिंडलकुंपी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
बाळेकुंद्री खुर्द येथे परिवहन मंडळाच्या बस कंडक्टरला झालेली मारहाण व त्यानंतर कंडक्टरविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या एफआयआरच्या पार्श्वभूमीवर शुभम शेळके यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड करून या घटनेचा निषेध केला होता. निषेध करताना कन्नड संघटनांबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करीत कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शुभम शेळके यांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओला काही कन्नड संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यांचा दबाव वाढताच माळमारुती पोलिसांनी सरकारतर्फे एफआयआर दाखल करून घेतला आहे. ‘बाळेकुंद्री खुर्द येथे घडलेली घटना दोघा जणांमधील भांडण आहे. त्याला भाषिक रंग देऊ नये’ असे स्पष्ट मत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. तरीही दबावाखाली येऊन पोलिसांनी मराठी नेते, कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविले आहे.









