अतिक्रमण करणाऱ्यांना शासनाचे अभय : लोकायुक्तांकडे तक्रार करणार
प्रतिनिधी /खानापूर
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडामंडळ सामाजिक संस्थेच्या मालकीच्या जागेवर लक्ष्मण शेट्टी यांच्याकडून अनधिकृत दुकानगाळे तयार करून लाखो रुपयांचे भाडे घेण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने व नगरपंचायतीने दुर्लक्ष केले असून लक्ष्मण शेट्टी यांनाच अभय देण्यात आले आहे. या बाबतची तक्रार नगरपंचायत, जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती आनंद वाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आनंद वाज यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, सामाजिक उपक्रमासाठी या क्रीडामंडळाची स्थापना केली होती. तत्कालीन संचालक मंडळाने शासनाकडून सध्या क्रीडामंडळ असलेली जागा 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली होती. या संचालक मंडळाने 1963 साली क्रीडामंडळ कॅन्टीन सुरू करण्यास बाबुराव शेट्टी यांना भाडेतत्त्वावर जागा दिली होती. त्यावेळी या जागेवर कॅन्टीन नावाचे
हॉटेल सुरू केले होते. मात्र 2009 साली क्रीडामंडळ क्लबच्या संचालक मंडळांनी लक्ष्मण शेट्टी व पूर्णकला शेट्टी यांना क्रीडा मंडळच्या शेजारी बोळ असलेली 5×54 खरेदी देण्यात आली. सदर खरेदी ही अवैध्य ठरविली आहे. मात्र यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या निकालानंतर क्रीडा मंडळ कॅन्टीन बंद केले होते. लक्ष्मण शेट्टी यांनी अपील केल्यानंतर फक्त हॉटेल उघडण्यास मुभा दिली होती. मात्र, लक्ष्मण शेट्टी यांनी हॉटेल इमारत पाडवून त्या ठिकाणी दहा दुकान गाळ्यांचे शेड उभारले. सदर जागा कर्नाटक सरकारच्या नावाने असूनही बांधकाम होत असताना तहसीलदार, नगरपंचायत यांनी या बाबतचा आक्षेप घेतला नाही. तसेच विनापरवाना बांधकाम करूनही दुकान गाळ्यांना विद्युतपुरवठा केलेला आहे. नगरपंचायतीच्या उताऱ्यावर कर्नाटक शासनाचे नाव असताना विद्युतपुरवठा कोणत्या आधारे देण्यात आला. असाही प्रश्न वाज यांनी केला. या क्रीडामंडळ कॅन्टीनचा नगरपंचायतीचा जवळपास लाखोचा महसूल थकलेला आहे. या बाबतही नगरपंचायतीने कोणतीच कारवाई केली नाही. तसेच या अनधिकृत गाळ्यांचे भाडे लक्ष्मण शेट्टी हे घेत आहेत. यामुळे शासनाचा वर्षाला लाखोचा महसूल बुडत आहे.
शहरातील पूर्वापार असलेल्या बोळामध्ये अनधिकृत बांधकाम करून दुकान गाळे तयार केले आहेत. अशा बोळातील अनाधिकृत दुकान गाळ्यांवर नगरपंचायतीने क्रम घ्यावा व हे बोळ येण्या-जाण्यासाठी मोकळे करावे, अशी मागणी वाज यांनी केली.
शहरात राजरोसपणे अनाधिकृत बांधकामे होत आहेत. याकडे नगरपंचायतीने कानाडोळा केलेला आहे. सामान्य लोकांना मात्र निर्माण टूच्या माध्यमातून परवाना घेण्यास भाग पाडण्यात येत आहे. यासाठी भरमसाट कर आकारण्यात येत आहे. तसेच वेळेवर परवानगीही देण्यात येत नाही. सामान्य रहिवाशांनी पाणीपट्टी भरली नसल्यास कनेक्शन तातडीने बंद करण्यात येते. मात्र शेट्टी यांच्या हॉटेलची 20 वर्षाची पाणीपट्टी थकीत आहे. शेट्टी यांनी शंभर मीटर दूरवर असलेल्या आपल्या दुसऱ्या इमारतीतील कूपनलिकेचे पाणी या अनधिकृतपणे बांधलेल्या हॉटेलला पुरविण्यात येत आहे. याबाबतही नगरपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. याबाबत नगरपंचायतीने कारवाई न केल्याने मी लोकायुक्तांकडे दाद मागणार आहे, असे आनंद वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.









