भात-ज्वारीची होणार खरेदी : केंद्रावरच विक्री करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
खरीप हंगामातील भात आणि ज्वारी पिकाची किमान हमीभाव योजनेंतर्गत खरेदी करावी, असा आदेश राज्य कृषी उत्पादन विक्री मंडळाने बजावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यात पाच ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करावीत, असा आदेशदेखील दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरच भात आणि ज्वारीची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगामातील भात, ज्वारी आणि इतर पिकांच्या उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना उत्पादित पिके कुठे विक्री करावीत, असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने खरेदी केंद्रे सुरू करून दिलासा दिला आहे. भाताला 2040 ते 2970 असा हमीभाव ठरविण्यात आला आहे.
भातपिकासाठी खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्याकडून प्रतिएकरला 25 क्विंटलप्रमाणे किमान 40 क्विंटल आणि ज्वारी पिकासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून प्रतिएकरला 10 क्विंटलप्रमाणे 20 क्विंटल खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, कृषी खात्याच्या परीक्षकांकडून भात आणि ज्वारीची पाहणी करून खरेदी केली जाणार आहे.
मध्यस्थींमार्फत माल न पाठवण्याचे आवाहन
बेळगाव तालुका कृषी पत्तीन विक्री सहकारी संघ, कित्तूर येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघ, बैलहोंगल येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ आदी ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मालाच्या खरेदीनंतर संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनी मध्यस्थींमार्फत माल पाठवू नये. स्वत: माल घेऊन खरेदी केंद्रात यावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.









