अध्याय विसावा
उद्धव म्हणाला, देवा गुणदोष बघू नकोस म्हणजे तू ब्रह्मस्वरूप होशील असे आपण म्हणता कारण सर्व विश्व ब्राह्मव्याप्त आहे आणि ब्रह्म परिपूर्ण असल्याने गुणदोषांना जागाच नाही असे आपले म्हणणे आहे पण आपणच गुणदोष, विधिनिषेध इत्यादी गोष्टी वेदात सविस्तर सांगितल्या आहेत आणि वेदवाणी ही सर्वांना शिरसावंद्य आहे पण आताच्या तुझ्या सांगण्यावरून वेद हे प्रमाणभूत मानावेत किंवा नाहीत हे मुळीच कळत नाही. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा तर गुणदोष पाहता कामा नये. तुझे वेदवचन मानावे तर गुणदोष पाहात बसले पाहिजे. असल्या तुझ्या भाषणाने मोठे ज्ञानीसुद्धा संशयात पडतात. मग सामान्य माणसानं काय करावं बरं? माझे भाषण व वेदवचन ही दोन्ही प्रमाणे सारखीच आहेत असे म्हणतोस, तर मग गुणदोषदर्शनात परस्परविरुद्ध मत का मांडत आहेस? वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण घडले नाही तर मोक्ष मिळत नाही म्हणून वेद हा प्रमाण माना असे तू म्हणतोस पण मोक्ष मिळवण्यात कठीण ते काय? सारी कर्मेच सोडून दिली, तर मोक्ष हा मिनतवाऱया न करता आपण होऊनच घरी चालत येईल.
आता कदाचित तू असे म्हणशील की, वेदाचा अर्थ कळला नाही, तर कर्म केले किंवा टाकले तरी खरोखर मोक्ष कधीही हाताला यावयाचा नाही. दोराचाच मोठा थोरला सर्प आहे असा भास झाला, तर तेथे हजारो मंत्र जपून किंवा वाजंत्र्यांचा कडकडाट करून किंवा थोपटूनही तो केसभरसुद्धा तिकडून ढळणार नाही. तोच नीट निरखून पाहिला की पुरे, तो सर्प नाहीसाच होतो. त्याप्रमाणे वेदवचनांचा यथायोग्य विचार सर्वजण करत असतात कारण त्यामुळे संसाराचे भय नाहीसे होते.
भवभयाचे निरसन होणे याचंच नांव ‘मोक्ष’. तो वेदाच्या ज्ञानावाचून दुसऱया कशानेही हाती यावयाचा नाही. वेदात सांगितलेला कर्मत्यागाचा विधी न करता केवळ उन्मत्तपणानेच कर्म टाकून दिले, तर त्यायोगे मोक्ष तर मिळणारच नाही, पण उलट पाखांडीपणा मात्र पदरांत पडेल. ह्याकरिता वेदात सांगितल्या विधीप्रमाणेच कर्मत्याग करून यथोचित संन्यासग्रहण केले, तर मग वेदाचा पांग पडणार नाही असेही कदाचित् तू म्हणशील, तर तोही विचार योग्य वाटत नाही. कारण गुरुवाक्मय श्रवण करण्यासाठी संन्यास घ्यावयाचा असतो. त्या श्रवणालाही विधिविधान असते. गुरुमुखाने महावाक्मय श्रवण करणे हा सुद्धा वेदार्थच आहे. आता देवपितरार्थ यज्ञ केले, तर तेही प्रसन्न होऊन मोक्ष देतील पण तेसुद्धा वेदाशिवाय होत नसते.
स्वाहाकाराने देव तृप्त होतात आणि स्वधाकाराने पितर तृप्त होतात. सारांश, वेदविधीशिवाय देव किंवा पितर कधीच प्रसन्न होणार नाहीत. मिथ्यारूप असलेले स्थावर व जंगम तसेच देव, मनुष्य आणि पितर ह्या सर्वांना वेदच दाखवून देतो व ते पूज्यत्वाने थोर आहेत असेही प्रतिपादन करतो पण त्यांच्यातसुद्धा परस्परांना अत्यंत विरुद्ध असे उत्तम, मध्यम व कनि÷ अशा प्रकारचे तीन भेद करून दाखविण्याचा खटाटोपही वेदाचाच होय.
अशा रीतीने गुणदोषांच्या लक्षणांचा विस्तार तूच केला आहेस, त्यालाच मोक्षाचे साधन म्हंटले आहेस. मग त्या गुणदोषाकडे पाहू नकोस असे का म्हणतोस? तुझ्या अशा भाषणाच्या उलटसुलट प्रकाराने तुझ्या बोलण्यातच विरोधाभास उत्पन्न होतो आणि त्यामुळेच गुणदोषांचा प्रकार वाढून त्याची बाधा तत्काळ जाणवते.
संसार पाहू गेले तर सगळा काल्पनिक आहे. त्यात एक स्वर्ग, एक नरक हा मोक्ष व हा बंध अशी वेदवचने सांगून लोकांना तूच भ्रमात पाडले आहेस. पूर्वी पुरुषाच्या मनात गुणदोषांचा गंधही नव्हता पण तुझ्या वेदवचनाच्या प्रकारामुळे गुणदोष पाहण्यात दृष्टी दृढ होऊन गेली. तात्पर्य, तुझ्या ह्या भाषणाने लोकांची नागवणच होते. दारुण नरक भोगावयास कारण तुझी ही भ्रामक वेदोक्तिच झाली आहे.
गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीचीच आहे कोणा माणसाची नव्हे आणि वेदांनी भेददृष्टीचा निषेधही केला आहे यामुळेच माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे.
क्रमशः







