अज्ञातांचे कृत्य : अनगोळ परिसरातून संताप
बेळगाव : अनगोळ येथे घराच्या पाठीमागील बाजूस ठेवण्यात आलेल्या गवतगंजीला अज्ञातांनी आग लावल्याने शेतकऱ्याचे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नितेश कृष्णा कंग्राळकर (रा. रघुनाथपेठ, मुस्लीम गल्ली, अनगोळ) यांनी चार ट्रॅक्टर गवत जनावरांसाठी साठवून ठेवले होते. दरवर्षीप्रमाणे त्यांनी ही साठवणूक केली होती. त्यांची पाच जनावरे आहेत. त्यासाठी हा साठा ठेवण्यात आला होता. मात्र अज्ञातांकडून दोन्ही गवतगंजीना आग लावण्यात आली. शेजाऱ्यांना ही घटना दिसून आली. त्यानंतर त्यांनी तातडीने नितेश यांना उठविले. आग लागताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही गवतगंजी आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आहे. या परिसरात अमलीपदार्थ सेवन करण्यासाठी अनेक जण रात्रीच्यावेळी बसलेले असतात. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. मात्र पोलिसांनीच तुम्हाला कंपाऊंड बांधता येत नाही का?, असा प्रश्न करून गरीब शेतकऱ्याला जाब विचारला आहे. या प्रकारामुळेही नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.









