तीन-चार वर्षांपासून प्रशासनाचे रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष : प्रशासनाला जाग येणार कधी?
वार्ताहर /कणकुंबी
गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासनाने चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरील खड्यांनी अनेकांचे बळी घेतले. काहीना अपंगत्व आले तर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्याची दुर्दशा पाहून अनेक प्रवाशांना व खासगी वाहनधारकांना पाझर फुटत आहे. सध्या चिखले क्रॉस ते चोर्ला रस्त्यावरील जीवघेणे खड्डा पाहून गोव्याला जाणाऱ्या काही टिप्पर चालकानी अनेक वेळा आपल्या टिप्परमधील खडी किंवा चिपिंग (डस्ट) टाकून सामाजिक भान जपले आहे. चोर्ला रस्त्यावरील अतिशय धोकादायक खड्डा पाहून आमटे येथील टिप्पर चालक अंकुश सावंत यांनी बुधवारी आपल्या टिप्परमधील डस्ट (भूस्सा) बेटणेनजीकच्या एका धोकादायक खड्यांमध्ये ओतून वाहनांना होणारा धोका टाळला. यावेळी त्यांच्यासमवेत केरी गोवा येथील युवक श्रीकांत गावस यांनी सुद्धा आपल्या टिप्परमधील चिपिंग ओतून फावड्याने सफाट केले. दररोज गोव्याला खडी घेऊन जाणाऱ्या टिप्पर चालकांपैकी अगदी मोजकेच काही चालक माणुसकीच्या दृष्टीकोनातून खड्यांमुळे वाहनधारकांना व वाहनांना होणारा त्रास दूर केला. परंतु अशा पद्धतीचा उपक्रम युवकांच्याकडून किती दिवस चालणार? हा अनुत्तरीत प्रश्न आहे. यापूर्वी सुद्धा अंकुश सावंत व श्रीकांत गावस यांनी चिखले क्रॉस, बेटणे, कणकुंबी नर्सरी अशा विविध ठिकाणी वेळोवेळी आपल्या टिप्परमधील खडी किंवा चिपिंग टाकून थोड्याफार प्रमाणात रस्त्यावरील खड्डा बुजवण्याचे काम केले. युवकांच्या या सामाजिक उपक्रमामुळे त्यांचे प्रवाशांतून कौतुक होत आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
परंतु प्रशासन मात्र निद्रिस्त झाले आहे. आता चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात पुन्हा एकदा नागरिकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. फेब्रुवारी संपत आला तरी रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने शिल्लक राहिलेल्या दोन-तीन महिन्यात बेळगाव ते चोर्ला हा 52 कि. मी. रस्ता कसा होऊ शकतो. पुढील महिन्यांपासून वळीव पावसाला सुरुवात होते. त्यामुळे या भागात रस्ता करणे अवघड होऊन जाते. दोन-तीन महिन्यात जर रस्ता झाला नाही तर जूनपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा चार महिने रस्त्याच्या कामाला सुरुवात करता येणार नाही. म्हणजे यावर्षी सुध्दा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था होणार की काय असा प्रश्न नागरिकांसह प्रवाशांना पडला आहे.
…तर कणकुंबी जांबोटी येथे रास्तारोकोचा इशारा
जर या महिना अखेरपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर कणकुंबी जांबोटी या ठिकाणी रास्तारोको करून प्रशासनाला धारेवर धरण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.









