बेळगाव : मावळते पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधण्याचा सपाटा हाती घेतला आहे. पोलीस दलाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होण्यासाठी आता केवळ आठ दिवस शिल्लक आहेत. तरीही पोलीस आयुक्तांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. मंगळवारी आपल्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह त्यांनी येळ्ळूर व हुदलीला भेट दिली. येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालय व डिजिटल ग्रंथालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना तेथील उपक्रमासंबंधी माहिती दिली. ग्रंथालय पाहून पोलीस आयुक्त भारावून गेले आहेत. येळ्ळूरचे डिजिटल ग्रंथालय अतिशय उत्तम पद्धतीने चालविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हुदलीला भेट देऊन तेथील कामकाजाची त्यांनी पाहणी केली. खादी ग्रामोद्योग व स्वदेशी चळवळीविषयी स्थानिक पदाधिकारी व नागरिकांकडून माहिती घेऊन आयुक्तांनी छायाचित्रेही पाहिली.
येळ्ळूरच्या डिजिटल ग्रंथालय कामामुळे आपण भारावून गेलो
गावकऱ्यांशी चर्चा करून तेथील समस्या जाणून घेतल्या. यासंबंधी ‘तरुण भारत’ला माहिती देताना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा म्हणाले, मंगळवारी आपण येळ्ळूर व हुदली येथे भेट दिली. तेथील नागरिकांशी चर्चा केली आहे. येळ्ळूरचे डिजिटल ग्रंथालय व खादी ग्रामोद्योगच्या कामकाजाने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटच्या दिवसापर्यंत उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत राहण्यासाठी धडपड
एस. एन. सिद्धरामप्पा हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. 29 फेब्रुवारी रोजी पोलीस दलाच्या सेवेतून ते निवृत्त होणार आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. यावेळी त्यांच्यासमवेत बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. व इतर अधिकारी उपस्थित होते.









