विकलेला तेलसाठा जप्त करण्याची प्रक्रिया
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीकच्या घाटात तब्बल 30 लाख 38 हजार रुपये किमतीच्या खाद्यतेलावर डल्ला मारण्यात आला होता. हिरेबागेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याची माहिती मिळाली आहे. चोरलेल्या खाद्यतेलाची विक्री करण्यात आली आहे. यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. आसाममधील दोघा ट्रकचालकांना पोलिसांनी अटक केली असून रविवारी रात्री उशिरापर्यंत हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात त्यांची कसून चौकशी करण्यात येत होती. 17 फेब्रुवारी रोजी चोरीची ही घटना उघडकीस आली होती. केए 20 एए 6062 क्रमांकाच्या ट्रकमधून मंगळूरहून बेळगावकडे खाद्यतेल आणण्यात येत होते. या ट्रकवर आसाममधील इब्राहिम अली व साहेब अली हे दोघे चालक म्हणून कामावर होते. बेळगावला पोहोचण्याआधी बडेकोळ्ळमठ घाट परिसरात ट्रकमधील तेलाचा साठा उतरवून दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आला होता. यासंबंधी शनिवारी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात ट्रकमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी हिरेबागेवाडी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली होती. खाद्यतेलावर डल्ला मारणाऱ्या चालकांना ताब्यात घेण्यात आले असून विक्री करण्यात आलेला तेलाचा साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.









