भिंरोडा, ठाणे परिसरात गुरांचा संशयास्पद मृत्यू : पशुवैद्यकीय खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
वाळपई : सध्या देशांत अनेक ठिकाणी लम्पी रोगाने गुरांचे बळी पडत आहेत. मात्र गोव्यात अजूनतरी अशी लक्षणे असलेली गुरे सापडलेली नाही, असा दावा पशुसंवर्धन खात्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाळपईसह आसपास लम्पी सदृश लक्षणे असलेली गुरे आढळून आली असल्याचे गुरांच्या मालकांनी दावा केला असून यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी अशा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा हा रोग आसपास परिसरात वेगाने फैलावण्याची भीती लोकांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यात भिरोंडा व ठाणे भागामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून गुरे दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे फोटोही संबंधित शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले आहेत. यामुळे संबधित गुरांना कोणता रोग झाला याबाबतचे निदान झालेले नाही. याकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ओमकार शिरोडकर यांनी यासंदर्भाचे फोटो घेतले असून या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की अंगाला जखमा व पांढरे चट्टे उटलेली गुरे वाळपईत फिरत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र याकडे अजून पर्यंत नगरपालिकेने लक्ष दिलेले नाही. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन खात्याने या संदर्भाची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे अजून पर्यंत लक्ष देण्यात आलेली नाही असे यावेळी त्यांनी सांगितले. भिंरोडा भागामध्ये गेल्या आठ दिवसापासून एकूण चार गुरांचा अचानक मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सरपंच उदयसिंग राणे यांनी गेल्या आठ दिवसांत गुरे दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात पशुसंवर्धन खात्याने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.









