कुसमळीजवळील रेडेकोंड नजीक गेला होता पोहायला : शोधमोहीम सुरू

वार्ताहर /किणये
कुसमाळी जवळील मलप्रभा नदीतील रेडेकोंड नजीकच्या एका कोंडीत पोहताना बहाद्दरवाडी गावचा तरुण बुडाला. राहुल मनोहर मुळीक (वय 29) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून रविवारी दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामुळे बहाद्दरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. महाशिवरात्रीनिमित्त बहाद्दरवाडी गावातील नागरिक कुसमुळी जवळच्या मलप्रभा नदीवरील रेडेकोंड येथे यात्रेसाठी रविवारी गेले होते. स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, नदीतील रेडेकोंडच्या वरच्या बाजूतील एका कोंडीत राहुल पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल पाण्यात बुडाला असल्याचे काही तरुणांनी पाहिले. लागलीच काही पोहता येणाऱया तरुणांनी पाण्यात उडी मारून त्याला शोधण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो सापडला नाही. ही माहिती नदीवर गेलेल्या सर्व भाविकांना समजली. त्यांनी बहाद्दरवाडी गावातील काही प्रमुख पंचांना याबाबत माहिती दिली. पंचमंडळी नदीवर दाखल झाले. खानापूर पोलिसांना या घटनेची माहिती देताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच बेळगाव येथून आलेल्या पाणबुडय़ांनीही नदीत शोधमोहीम राबविली. मात्र पाणी गडूळ झाले असल्यामुळे राहुलचा मृतदेह रविवारी सायंकाळपर्यंत अद्याप सापडला नाही. या घटनेमुळे बहाद्दरवाडी-किणये परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा नदीत बुडाला असल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. राहुल हा नावगे क्रॉस येथील एका कंपनीत कामाला जात होता. तो म. ए. समितीचा एकनिष्ठ कार्यकर्ता होता. नदीच्या पाण्यात बुडून त्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राहुलचा मृतदेह अद्याप सापडला नसून सोमवारी सकाळी पुन्हा त्याचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.









