लाटंबार्से परिसरातील शेतकरी चिंतेत, : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी तातडीने घेतली अधिकाऱ्यांची बैठक
लाटंबार्से ; तिलारी धरणाचे पाणी डिचोली तालुक्यातील सोनारभाट लाडफे नानोडा, अडवलपालआदी भागांत गेल्या काही महिन्यांपासून पाणी गायब झाल्याने या ठिकाणी लागवड केलेली शेती, बागायती, हिरवा चारा, भाजी मिरची लागवड करपून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कालव्याचे पाणी त्वरित सुरू करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी सोनारभाट, लाडफे, नानोडा, साळ, अडवल पाल, साळ भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. सरकरने पडीक शेतजमिनीत लागवड करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पडीक जागेत भातशेती बरोबर बागायती, मिरची, भाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु ऐनवेळी तिलारी कालव्याचे पाणी सतत अनियमितपणे यशतश किंवा अचानक गायब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उन्हाळ्यात मिरची, भाजीपाला, केळी, गुरांचा हिरवा चारा पाण्याची नितांत गरज असते. परंतु पाणीच नसल्याने पिकांची नासाडी झालेली आहे. अडवल पाल या भागात पाण्याविना सुपारीची झाडे सुकून गेली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी काय बिघाड असेल तर तातडीने दुऊस्ती करून सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक आमदार डॉ चंद्रकांत शेट्यो यांनी लाटंबार्से मतदारसंघातील शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत गांभीर्याने चर्चा केली. पाण्याची जी काय समस्या असेल ती सोडवा व तातडीने पाणीपुरवठा सुरू करा, अशा आमदारांनी सूचना केल्या. यावेळी जलसिंचन खात्याचे कनिष्ठ अभियंता मल्लिकार्जुन, साहाय्यक अभियंता माजिक, कार्यकारी अभियंता मिलिंद गावडे, महारास्ताचे कार्यकारी अभियंताही उपस्थित होते. यावेळी सरपंच पद्माकर मलिक, माजी उपसरपंच बाबासाहेब राणे, शेतकरी संतोष कळंगुटकर, रत्नाकर गाड, जूझे डिसोझा, पंच कुष्णा आरोलकर आदीसह अन्य शेतक्रयांनी यावेळी विविध प्रश्न उपस्थित केले.









